सर्वसामान्यांवर होणारा अन्याय शेकाप कदापि सहन करणार नाही – डाॅ.बाबासाहेब देशमुख‌

 

सांगोला :

              देशाला स्वातंत्र्य मिळूनही जर वंचीत लोकांचे प्रश्न आजही जसेच्या तसेच रहात असतील तर, ही सर्वांसाठी लाजीरवाणी गोष्ट असून भारत सरकारच्या जलजीवन मिशन अंतर्गत पिण्याच्या पाण्याच्या ज्या योजना आहेत,त्या योजनांमध्ये जर कांही लोक भ्रष्टाचार करीत असतील व स्वत:चा स्वार्थ साधत असतील तर, हे योग्य नाही,अशा गोष्टी शेतकरी कामगार पक्ष खपवुन घेणार नाही. कांही गांवांमध्ये तर,जलजीवन मिशन अंतर्गत झालेल्या कामात त्या त्या गांवच्या सरपंच व ग्रामसेवक यांनाही अंधारात ठेवून उघड उघड भ्रष्टाचार केला आहे.कांंही गांवांमध्ये कुठलेही काम न करता बिले काढण्यात आली आहेत. निधी वाटपाचा नियम व कायदा धाब्यावर बसवून ठराविक ठेकेदारांना ठेका देण्यात आला असून ही सरळ-सरळ भ्रष्टाचाराची साखळी समोर येत आहे. सदर भ्रष्टाचारामध्ये दोषी असलेल्या लोकांवर त्वरीत कारवाई झालीच पाहीजे,यापुढील काळात सर्व सामान्यांवर होणारा अन्याय शेकाप कदापि सहन करणार नाही, असा इशारा डाॅ.बाबासाहेब देशमुख‌ यांनी सोलापूर येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील शेकापच्या उपोषणादरम्यान दिला.

नवबौद्ध समाज व दलीत वस्त्यांसाठी आलेल्या निधीच्या वाटपामध्ये होत असलेल्या अनियमिततेच्या विरोधात व जलजीवन मिशनमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराविरोधात शेतकरी कामगार पक्ष व पुरोगामी युवक संघटना, सांगोला यांच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले असता प्रशासनाच्या आश्वासनानंतर हे उपोषण तूर्त मागे घेण्यात आले असून यावेळी, मागण्यांचे निवेदन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कोहिनकर, समाजकल्याणचे खमीतकर व ग्रामपंचायत विभागाकडील अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इशांत शेळकांदे यांनी निवेदन स्वीकारले.

उपोषणादरम्यान बोलताना डॉ.बाबासाहेब देशमुख पुढे म्हणाले की,अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्त्यांच्या निधी वाटपातील जी अनियमितता समोर आली आहे ती अतिशय धक्कादायक असून शासकिय नियम डावलून या योजनेत कांही गावांचा समावेश करण्यात आला आहे.तसेच कांही गांवांमध्ये कामे न करताच बिले अदा केली आहेत.एवढा मोठा भ्रष्टाचार हा अनेकांच्या संगनमताने झालेला असून प्रशासनाने कोणाच्या दबावाखाली हे नियमबाह्य कृत्य केले हे समोर आले पाहिजे. ते पुढे म्हणाले की,सांगोला तालुका म्हंटले की, अत्यंत निष्कलंकपणे, कोणतेही राजकारण डोक्यात न ठेवता,विकास कामे करणारे नेते व भ्रष्टाचाराला थारा न देणारे नेते म्हणून स्व.गणपतराव देशमुख हे नांव सर्वश्रूत असून स्व.आबासाहेबांची व सांगोला तालुक्याची ही ओळख असताना सध्या विविध विकास कामांमध्ये भ्रष्टाचार होत आहे, ही आपल्या तालुक्यासाठी लाजीरवाणी गोष्ट आहे.या सर्व प्रकरणात व येणाऱ्या काळात जर,सर्व सामान्यांवर अशा प्रकारे अन्याय झाल्यास,शेतकरी कामगार पक्ष स्वस्थ बसणार नसल्याचा इशारा डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी यावेळी दिला.

याप्रसंगी,शेकापचे जेष्ठ नेते भाई चंद्रकांतदादा देशमुख म्हणाले की, प्रशासनाने विकासामध्ये आपली भुमिका योग्य प्रकारे हाताळावी व कुणाच्याही दबावाखाली येऊन विकास निधी वाटपामध्ये दूजाभाव करु नये.येणाऱ्या काळात शेतकरी कामगार पक्ष हा अशा‌ गोष्टीं विरोधात ठाम भूमिका घेणार असल्याचे सांगितले. यावेळी शेकापचे अभ्यासू नेते भाई बाबासाहेब करांडे यांनी निधी वाटपातील नियम व कायदा याचे सविस्तर विश्लेषण करुन निधी वाटप करताना ज्या गांवाला व वस्त्यांना निधी मिळाला नाही,त्याला अग्रक्रम द्यावा व एकवेळा निधी मिळाला असेल‌ ते गांव‌ व वस्ती ऩंतर घ्यावी. एकाच गांवाला सतत निधी न देता नियमानुसार निधीचे वाटप करावे, असे निधी वाटपाचे कायदेशीर सूत्र असल्याचे बाबासाहेब करांडे यांनी सांगीतले. येणाऱ्या काळात निधी वाटपातील हा गोंधळ शेतकरी कामगार पक्ष खपवुन घेणार नाही तसेच जलजीवन मिशन अंतर्गत कामांमध्ये झालेला भ्रष्टाचार आम्ही समोर आणला असून त्याबाबतचे निवेदन आम्ही प्रशासनाच्या स्वाधीन केले आहे.आमच्या निवेदनाची दखल घेऊन संबंधित अधिकारी कोळी यांची बदली करण्यात आली आहे. परंतु प्रशासनाने अजूनही त्यांना पदमुक्त केले नाही,ते ताबडतोब करण्याची मागणी बाबासाहेब करांडे यांनी यावेळी केली.

यावेळी पं.समितीचे माजी सभापती बाळासाहेब काटकर म्हणाले की, विकासाच्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत,त्या योजनांच्या माध्यमातुन जनतेचा विकास साधायचा असतो,तो विकास साधत असताना वंचित घटकांवर अन्याय होणार नाही,याची काळजी घेणे गरजेचे असताना अनुसुचित जाती व नवबौद्ध घटकांच्या विकासाच्या योजनांमध्येच जर दूजाभाव होत असेल तर,हे अयोग्य व निषेधार्ह आहे.शेकापच्या वतीने आम्ही गेले अनेक दिवस मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देऊन माहीती दिली आहे,तरीही कुठलीही प्रतिक्रिया किंवा कारवाई होताना दिसत नसल्याने आज आम्ही उपोषणाचा मार्ग अवलंबला असून जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत, आम्ही लढतच राहणार असल्याचे सांगितले. यावेळी, माजी उपसभापती संतोष देवकते म्हणाले की, प्रशासनाने आमचा अंत पाहू नये,आंम्ही‌ स्व.आबासाहेबांच्या विचारांनुसार काम करणारे लोक आहोत.शेतकरी,कष्टकरी,दलित, कामगार व महिला यांचे नेतृत्व करणारा हा शेकापक्ष असून सर्व सामान्यांच्या प्रश्नांसाठी शेकाप सतत लढत आला आहे व डॉ.बाबासाहेब देशमुख‌ यांच्या नेतृत्वाखाली लढत राहील.जाणुनबुजून कोणावर अन्याय होत असेल‌ तर,शेकाप गप्प बसणार नाही,असे संतोष देवकते म्हणाले. यासमयी,माजी उपसभापती नंदू शिंदे म्हणाले की,प्रशासनाशी चर्चा करुन त्यांना सांगूनही प्रशासनातील अधिकारी हलगर्जीपणा करीत असतील तर,हे कदापि खपवुन घेतले जाणार नाही. प्रशासनाच्या या आडमुठ्या धोरणामुळे तसेच वंचित व दलित वस्त्यांचा विकास निधीमुळे गरजू व दलित वस्त्यांचा विकास रखडला जातोय.येणाऱ्या काळात असे प्रकार निदर्शनास आले तर, प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करु, असे शिंदे यांनी सांगितले

सदर‌‌ उपोषणास शेकापचे तालुका चिटणीस दादाशेठ बाबर,माजी ता.चिटणीस विठ्ठलराव शिंदे,संगम धांडोरे यांच्यासह जि.प.चे आजी माजी सदस्य,पं.स.चे आजी माजी सभापती व सदस्य,सूतगिरणीचे आजी माजी चेअरमन, व्हा.चेअरमन व संचालक,खरेदी विक्री संघाचे चेअरमन, व्हा.चेअरमन व संचालक, मार्केट कमिटीचे चेअरमन,व्हा. चेअरमन व संचालक,सर्व गटनेते, शेकापचे सरपंच -उपसरपंच व सदस्य तसेच शेकापचे व पुरोगामी युवक संघटनेचे नेते व पदाधिकारी उपस्थित होते,अशी माहिती शेकापचे प्रसिद्धी प्रमुख चंद्रकांत सरतापे यांनी दिली.
—————————————————————————