मनोरंजन

पाकिस्तानचा ऐतिहासिक पराभव करत भारताच्या टीमने मेलबोर्नच्या मैदानावर केली दिवाळी साजरी

 

मेलबोर्न :

         ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या टी-२० वर्ल्डकपच्या दुसऱ्याच दिवशी (रविवारी) भारत-पाक स्पर्धेचा सर्वात थरारक असा ऐतिहासिक सामना पहायला मिळाला. मेलबोर्नच्या मैदानावर रविवारी दुपारी झालेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा ४ विकेटनी दणदणीत पराभव करुन गेल्या वर्षीच्या म्हणजेच २०२१ च्या टी-२० वर्ल्डकप मध्ये झालेल्या पराभवाचा जबरदस्त बदला घेतला व पाकिस्तानचा ऐतिहासिक पराभव करत भारताच्या टीमने मेलबोर्नच्या मैदानावर दिवाळी साजरी केली.

पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत भारतासमोर १६० धावांचे आव्हान दिले होते. ३१ धावांवर ४ विकेट गमावल्यानंतर विराट कोहली आणि हार्दिक पंड्या यांनी मनावर घेतले आणि मॅच कशी जिंकायची असते ? हे पाकिस्तानला हरवून दाखवून दिले.

टी-२० वर्ल्डकपच्या इतिहासात सर्वात थरारक ठरली शेवटची ओव्हर

टी-२० वर्ल्डकपच्या इतिहासात सर्वात थरारक ठरलेल्या शेवटच्या ओव्हरध्ये विजयासाठी भारताला १६ धावांची गरज होती, मैदानावर विराट आणि हार्दिक होते.दोघांनी मिळून शतकी भागिदारी केली होती त्यामुळे, हे दोघे विजय मिळून देणार,याची चाहत्यांना पुरेपूर खात्री होती. पण तेवढ्यात, पाकिस्तानकडून मोहम्मद नवाज गोलंदाजी करत असताना पहिल्याच चेंडूवर हार्दिक पंड्या बाद झाला व या विकेटमुळे भारताचे टेन्शन वाढले. नंतर फलंदाजीत स्फोटक असलेला दिनेश कार्तिक आला. त्याने दुसऱ्या चेंडूवर एक धाव घेतली. तिसऱ्या चेंडूवर विराटने दोन धावा घेतल्या. नवाजच्या चौथ्या चेंडूवर विराटने षटकार ठोकला आणि अंपायरने नो बॉल दिला. यामुळे भारताला फ्री हीट मिळाली. पुन्हा टाकण्यात आलेला चौथा चेंडू नवाजने वाइड टाकला.

आता भारताला ३ चेंडूत १२ धावांची गरज होती. भारताला अजून फ्री हिट मिळणार होती. विराट या चेंडूवर बोल्ड झाला पण चेंडू सीमा रेषेकडे गेला आणि तेवढ्यात विराट-कार्तिक जोडीने ३ धावा पळून काढल्या. आता भारताला २ चेंडूत २ धावांची गरज होती. कार्तिक स्ट्राइकवर होता. मात्र शॉट खेळण्याच्या नादात तो बाद झाला. आता भारताला १ चेंडूत २ धावांची गरज होती. नवाजने या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा चुक केली. फलंदाजीला आलेल्या अश्विनला त्याने चेंडू टाकला खरा, पण तो वाईड ठरला. भारताला १ चेंडूवर १ धाव हवी होती. अश्विनने शेवटच्या चेंडूवर चूक न करता त्याने मीड ऑफचा चेंडू मारला आणि तो चौकार गेल्याने सामना हारण्याची शक्यता असताना भारताने पाकिस्तानचा ऐतिहासिक पराभव करत सामना जिंकल्याने संपूर्ण देशभरात एकच जल्लोष करण्यात येवून दिवाळीच्या मुहूर्तावर आणलेल्या फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली.

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button