सांगोला येथील शिवाजी पॉलिटेक्निकमध्ये डिप्लोमा इंजीनियरिंग प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ
सांगोला :
सांगोला येथील शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता १० वी नंतरच्या डिप्लोमा इंजीनियरिंग प्रवेश प्रक्रियेला दि.२९ मे २०२४ पासून सुरुवात झाली असल्याची माहिती कॉलेजचे प्राचार्य डॉ.आर.ए.देशमुख यांनी दिली.
प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रियेसाठी शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेज,सांगोलाच्या (६४७१) सुविधा केंद्राला मान्यता मिळाली असून बुधवार दि.२९ मे २०२४ पासून ऑनलाइन प्रवेश अर्ज भरणे,कागदपत्रे पडताळणी व अर्ज निश्चिती या प्रक्रिया सुरु झाल्या आहेत. दहावीच्या परीक्षेचा फक्त आसन क्रमांक टाकून विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज भरता येणार आहे.या प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना जन्म प्रमाणपत्र किंवा रहिवाशी दाखला आवश्यक आहे,अशी माहिती प्राचार्य डॉ.आर.ए.देशमुख यांनी दिली.
दि.२९ मे २०२४ ते २५ जून २०२४ या कालावधीत प्रवेश प्रक्रियेसाठी महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावरुन अर्ज छाननीची योग्य पद्धत निवडून ऑनलाइन नोंदणी करणे,कागदपत्रांच्या स्कॅन छायाप्रती अपलोड करणे तसेच आपल्या प्रवर्गासाठी कागदपत्रांची पडताळणी करुन संबंधित विद्यार्थी आपला प्रवेश अर्ज निश्चित करु शकतात. दि.२७ जून २०२४ रोजी मंडळाच्या संकेतस्थळावर तात्पुरत्या गुणवत्ता याद्या प्रदर्शित करण्यात येतील. विद्यार्थी त्यांच्या प्रवेश अर्जात कांही त्रुटी असल्यास दि.२८ जून ते ३० जून २०२४ या दरम्यान दुरुस्त्या करुन घेऊ शकतात.मंडळाच्या संकेतस्थळावर दि.२ जुलै २०२४ रोजी अंतिम गुणवत्ता याद्या प्रदर्शित करण्यात येतील.
शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेजचे हे १६ वे वर्ष असून कॉलेजने आपली उज्वल यशाची परंपरा कायम राखली असून येथून उत्तीर्ण होऊन बाहेर पडणारे विद्यार्थी हे एक परिपूर्ण इंजिनियर किंवा व्यावसायिक होऊन बाहेर पडतात.कॉलेजमध्ये असणाऱ्या उपलब्ध सुविधा, शिक्षणाचा दर्जा व शिस्त या गोष्टींमुळे पालकांची शिवाजी पॉलिटेक्निकला नेहमीच पसंती राहिली आहे.सन २०२४-२५ च्या प्रवेश प्रक्रियेसाठी शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेजमधील सुविधा केंद्रातील सर्व यंत्रणा सज्ज असून विद्यार्थ्यांनी व पालकांनी प्रवेशासंबंधी अधिक माहितीसाठी सुविधा केंद्र प्रमुख प्रा.एस.एस.गायकवाड यांच्याशी संपर्क साधावा,असे आवाहन प्राचार्य डॉ.आर.ए.देशमुख यांनी केले आहे.
————————————————————
विद्यार्थी व पालकांच्या मार्गदर्शनासाठी सुविधा केंद्राची सोय :
सांगोला,जत,मंगळवेढा व इतर तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थी व पालक यांच्यासाठी प्रथम वर्ष डिप्लोमा इंजिनिअरिंगच्या प्रवेश प्रक्रियेचे मार्गदर्शन, संबंधित कागदपत्रे जमविताना येणाऱ्या अडचणी व शंका याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेज,सांगोला येथे सुविधा केंद्र उपलब्ध असून याचा फायदा पालकांनी घ्यावा.
– बी.आर.गायकवाड (अध्यक्ष – शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेज)
———————————————————————————