कोल्हापूर-सोलापूर महामार्गावरुन सांगोला शहराकडे येण्यासाठी वळण रस्त्याला मिळाली मंजूरी
सांगोला :
रत्नागिरी-नागपूर (कोल्हापूर-सोलापूर) या राष्ट्रीय महामार्गावरुन प्रवास करताना मिरजेकडून सांगोला शहराकडे येणाऱ्या नागरिकांसाठी व वाहनधारकांसाठी शहरालगत अधिकृत वळण दिलेले नसल्याने व दिशादर्शक फलकही लावले नसल्याने वाहनधारकांची मोठी गैरसोय व कुचंबना होत होती.ही समस्या लक्षात घेवून,सांगोल्यातील शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेने राष्ट्रीय महामार्ग विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन देवून याबाबत पाठपुरावा केला होता. या निवेदनाची दखल घेवून संबंधित विभागाने सांगोला शहराकडे जाणार्या वळण रस्त्याला मंजूरी देवून या रस्त्याविषयी लवकरच अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिल्याने वाहनधारकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
कोल्हापूर-सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावरुन प्रवास करताना मिरजेकडून सांगोला शहराकडे येणाऱ्या वाहनांना शहरालगत अधिकृत वळण दिलेले नसल्याने व दिशादर्शक फलकही लावले नसल्याने वाहनधारकांना सांगोला शहर जवळ आल्याचे समजत नाही. त्यामुळे,शहर सोडून बाह्यवळण (बायपास) रस्त्याने ६ ते १० कि.मी.लांब गेल्यावर मग लक्षात येते. त्याकरिता,सूतगिरणीच्या पुढे डाव्या बाजूला माऊली पेट्रोल पंपासमोर अधिकृत वळण व दिशादर्शकाची सोय तात्काळ करावी,असे निवेदन दिल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग विभागातील अधिकाऱ्यांनी १ एप्रिल २०२३ रोजी घटनास्थळी प्रत्यक्ष भेट देऊन सदर काम मार्गी लावू,असे आश्वासन दिले होते.
याविषयी अधिकाऱ्यांनी आश्वासन देवूनही मार्च पर्यंत कांहीच हालचाल न झाल्याने याबाबत दखल न घेतल्यास १ मे २०२४ रोजी महाराष्ट्र दिनी रास्ता रोको करणार असल्याचे सांगोला शहरवासीयांनी कळविल्यानंतर अशोक कामटे संघटनेच्या स्मरणपत्राची दखल घेऊन सांगोला सूतगिरणी येथील वजन काट्यासमोरुन सदरचा वळण रस्ता देण्याचे ठरल्याने सांगोला शहरात येणार्या अनेक प्रवासी व नागरिकांची मोठी सोय झाली आहे.
राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या वतीने सदर वळण रस्त्याचे उर्वरित डांबरीकरण करुन दिशादर्शक फलक लवकरच बसविण्यात येणार असल्याचे महामार्ग विभागाकडून सांगण्यात आले असून वाहनधारकांची होणारी गैरसोय दूर केल्याबद्दल राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अशोक कामटे संघटनेच्या वतीने आभार मानण्यात आले आहे.
—————————————————————————