सांगोला :
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे शरद पवारांना सध्या बारामतीच्या गल्ली बोळातच फिरावे लागत असून शरद पवारांना फक्त कारखाना कसा बंद पाडायचा ? सूत गिरणी कशी बंद पाडायची ? आणि ७/१२ नावावर कसा करायचा ? एवढचं माहीत आहे. शरद पवारांचं डोकं देशहितासाठी कधी चाललचं नाही,अशी जहरी टीका करत,भाजपाचे एकच मिशन असून “माढा सिंचन हेच,भाजपचे मिशन” आहे.तर, “माढा आणि शरद पवारांच्या बिन विचारांना पाडा”असे धोरण मतदारांनी अवलंबिले आहे,असे सांगून देशाचे कृषीमंत्री असताना पवारांनी माढा मतदारसंघाकडे दुर्लक्ष केल्याने शरद पवार नावाचं जहाज समुद्राच्या मध्यावर असून ते निश्चीतच बुडणार असल्याचे भाकित भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी वर्तवले.
माढा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार खा.रणजितसिंह निंबाळकर यांच्या प्रचारार्थ सांगोला तालुक्यातील कोळा येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर,माजी मंत्री सदाभाऊ खोत,आमदार शहाजीबापू पाटील,माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील,फॅबटेक उद्योग समुहाचे प्रमुख तथा शिवसेना नेते भाऊसाहेब रुपनर,भाजपाचे जेष्ठ नेते संभाजी आलदर,युवासेनेचे सागर पाटील,शिवसेनेचे तालुकाप्रमुख दादासाहेब लवटे,शिवाजी घेरडे,दुर्योधन हिप्परकर यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले की,कृष्णेचे पाणी सांगोल्याला येवू शकते,हे सत्यात आणण्याचे काम महायुतीच्या सरकारने केले.५ वर्षांपूर्वी टँकर,चारा छावणी,रोजगार हमीची कामे सुरु करण्यासाठी संघर्ष करावा लागत होता.या लोकांना आमदारकी दिली,यांचे कारखाने वाचवले,यांना पदे दिली तरीही,हे लोक भाजपसोबत प्रामाणिक राहत नाहीत.या भागाच्या विकासासाठी पैसे आणण्याची धमक फक्त खा.रणजितसिंह निंबाळकर यांच्यातच आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संविधानाच्या बाजूने ठामपणे उभे आहेत.महायुतीच्या सरकारने अहमदनगर जिल्ह्याचे नांव बदलून पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर, औरंगाबाद जिल्ह्याचे नाव धर्मवीर छत्रपती संभाजीनगर,सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ हे नांव दिले,हा धनगर समाजाचा मोठा सन्मानच आहे.माढा लोकसभा मतदारसंघ हा दुष्काळी पट्टा असून जनतेने पवारांच्या भूलथापांना बळी पडू नये.सर्वसामान्य माणसाला आमदार करण्याची ताकद केवळ भाजपामध्येच आहे. नरेंद्र मोदींनी नीम कोटेड युरियाची निर्मिती तयार करुन युरियाचा होणारा काळाबाजार रोखला असल्याचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी यावेळी सांगितले.
यावेळी बोलताना माजी मंत्री सदाभाऊ खोत म्हणाले की,देशाला विकासाच्या वाटेवर केवळ नरेंद्र मोदीच घेवून जावू शकतात.ही लढाई भारत विरुध्द इंडिया अशी असून इंडिया आघाडीत सर्व लुटारु एकत्रित आले आहेत.आघाडीचे सरकार हे मागील ७० वर्षात,गावगाड्यातील रस्ते,पिण्याचे पाणी व शेतीला पाणीही देवू शकले नाहीत.मोदींनी सत्तेत आल्यावर देश एकसंघ ठेवला. ३७० कलम हटवण्यासाठी निधड्या छातीचा नरेंद्र मोदी सारखा पंतप्रधान देशाला लाभला आहे.पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण आहे ? हे इंडिया आघाडी सांगू शकत नाही. माढा लोकसभा मतदारसंघ हा क्रांती करणारा मतदारसंघ आहे. गावगाड्यातला माणूस तुमच्या छाताडावर नाचू शकतो,हे या मतदारसंघाने सिध्द केले आहे.खा. रणजितसिंह निंबाळकर यांनी केंद्रातून पैसा आणला, शेतीच्या पाण्याला गती दिली,संपूर्ण रस्त्याचं जाळ विणलं,म्हणून विरोधक त्यांच्या विरोधात गेले आहेत. शरद पवारांनी सत्तेत असताना स्वामीनाथन आयोग लागू केला नाही.सामान्य माणसं राजकारणाच्या पटलावर उभा करण्याचे काम नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.ज्या वाड्यावर आयुष्यभर गुलाल उधळला जात होता,ते वाडे उध्वस्त करण्याचं काम भारतीय जनता पक्षाच्या काळात झालं.ही लढाई वाडा विरुध्द गावगाडा,प्रस्थापित विरुध्द विस्थापित अशी असून देशाच्या हितासाठी मतदारांनी महायुतीचे उमेदवार खा.रणजीतसिंह निंबाळकर यांना प्रचंड मतांनी विजयी करावे,असे आवाहन सदाभाऊ खोत यांनी यावेळी केले.
यासमयी,महायुतीचे उमेदवार खासदार रणजितसिंह निंबाळकर,आमदार शहाजीबापू पाटील,माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील,दादासाहेब लवटे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.
——————————————————————————
More Stories
भारत-संयुक्त अरब अमिराती संसदीय मैत्री समितीवर खा.धैर्यशील मोहिते-पाटील
सांगोला तालुक्यातील जि.प.व पं.स.च्या अनेक उमेदवारांचा खा.मोहिते-पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश
डॉ.परेश खंडागळे यांचे बंधूही लढवणार नगरपालिकेची निवडणूक