खासदार शोधा अन् बक्षीस मिळवा !

 

 

लोकसभा मतदार संघ म्हणजे एक कुटूंब व मतदार संघातील संपूर्ण जनता म्हणजे त्या कुटूंबातील सर्व सदस्य असतात तर, त्या मतदार संघाचा खासदार हा त्या कुटूंबाचा कर्ता पुरुष (कुटूंबप्रमुख) असतो.एकंदरीत, खासदार हा त्या मतदार संघातील जनतेचा एकप्रकारे नवराच असतो. आपल्या कुटूंबाचे पालन पोषण करणे आणि त्यांचा योग्यरितीने सांभाळ करणे ही कुटूंबप्रमुखाची जबाबदारी व कर्तव्य असते. परंतु,आपली जबाबदारी झटकून व कर्तव्य विसरुन कुटूंब प्रमुख हा जर फक्त बाहेरच फिरत असेल तर, का म्हणून या नवर्‍याशी लग्न लावलं ? (का म्हणून यांना खासदार करण्यासाठी मतदान केले ?) असा टाहो फोडण्याची वेळ त्या कुटूंबावर म्हणजेच जनतेवर आल्याशिवाय राहत नाही.
अगदी तशीच वेळ सध्या, माढा लोकसभा मतदारसंघातील (फलटण तालुका सोडून इतर तालुक्यातील) जनतेवर आली असून या मतदारसंघाचे कुटूंबप्रमुख (नवरा) असलेले खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना निवडून दिल्यापासून गेल्या तीन वर्षामध्ये ते आपल्या मतदारसंघात धूमकेतू सारखे मोजून दोन-तीन वेळा दिसले असतील.अन्यथा,ते फक्त फलटण, पुणे,मुंबई व दिल्लीतच तळ ठोकून राहिलेले दिसतात. त्यामुळे त्यांनी आपल्या मतदारसंघाकडे सरळसरळ दुर्लक्ष केले असून कुटूंबप्रमुख हा कायम बाहेरच राहत असल्याने कुटूंबाला न सांभाळणारा, “असला नवरा नको गं बाईssss”
असा सूर या मतदारसंघातील जनतेतून निघत असून बर्‍याच दिवसांपासून त्यांचे दर्शनच न झाल्याने शेवटी “खासदार शोधा अन् बक्षीस मिळवा” अशी जाहीरातच देण्याचा विचार या मतदारसंघातील जनता करु लागली.

        :  विजयदादांनी केलेली प्रतिष्ठेची निवडणूक  :

सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस,माढा, करमाळा,पंढरपूर तालुक्यातील कांही भाग व सांगोला तालुका या ४- ५ तालुक्यातील आणि विशेषत: माजी खासदार विजयसिंह मोहीते-पाटील यांच्या नेतृत्वाखालील माळशिरस तालुक्यातील जनतेने केलेल्या भरघोस मतदानामुळे २०१९ मध्ये पार पडलेल्या माढा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूकीत भाजपाचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर हे निवडून आले, यात तिळमात्र शंका नाही. नाहीतर, तसा नाईक-निंबाळकरांचा, त्यांचा स्वत:चा एक फलटण तालुका सोडून उर्वरित सोलापूर जिल्ह्यातील ४-५ तालुक्यातील जनतेशी कांहीच संबंध व संपर्क नव्हता. केवळ आणि केवळ त्यावेळची मोदींची लाट, योगायोगाने त्यांना मिळालेली भाजपाची उमेदवारी, राष्ट्रवादी काँग्रेसमधील गटबाजीला कंटाळून माजी खासदार विजयदादांनी भाजपाकडून केलेली प्रतिष्ठेची निवडणूक तसेच सांगोला तालुक्यातूनही शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील,भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांतदादा देशमुख, जेष्ठ नेते शिवाजीराव गायकवाड व राजश्रीताई नागणे आदी नेत्यांनी त्यावेळी अहोरात्र केलेल्या प्रचारामुळे २०१९ मध्ये पार पडलेल्या माढा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूकीत भाजपाचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर हे निवडून आले.

माढा पूर्वीपासूनच काँग्रेस व राष्ट्रवादीचा बालेकिल्ला :

वास्तविक पाहता, हा माढा मतदारसंघ म्हणजे पूर्वीपासूनच काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असून तत्कालीन पंढरपूर लोकसभा मतदार संघातून काँग्रेसचे (आय) संदिपान थोरात हे तब्बल ७ वेळा खासदार म्हणून निवडून आले. तद्नंतर, १९९९ मध्ये माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी काँग्रेसमधून बाहेर पडत स्वत:चा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला, तेव्हांपासून ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात गेली. २०१९ च्या लोकसभा निवडणूकीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजयमामा शिंदे हे सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात सातत्याने सक्रीय होते,या मतदारसंघातील सर्व लोकांशी त्यांचा दांडगा संपर्क होता. पण,शह काटशहाचे राजकारण व जनतेला हवा असलेला बदल या सर्व बाबी नाईक-निंबाळकरांच्या पथ्यावर पडल्या आणि ते निवडून आले.
या मतदार संघात भाजपाचे म्हणावे तेवढे प्राबल्य नसताना आणि खा.नाईक-निंबाळकर यांचा या मतदार संघातील जनतेशी त्यापूर्वी कसलाही संपर्क नसताना,केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदींची लाट, माजी खा.विजयदादा, आ. शहाजीबापू पाटील,श्रीकांतदादा व इतर नेते मंडळींच्या प्रयत्नामुळेच रणजितसिंह नाईक-निंबाळकरांच्या गळ्यात खासदारकीची माळ पडली, हे नाकारुन चालत नाही.

     : ना.आठवले व विजयदादांनीच ठेवला संपर्क  :

तत्कालीन पंढरपूर लोकसभा मतदारसंघ व आताच्या माढा लोकसभा मतदारसंघातून खा.संदिपान थोरात हे ७ वेळा,विद्यमान केंद्रीय मंत्री ना.रामदास आठवले हे २ वेळा तर, राष्ट्रीय नेते खा.शरद पवार व विजयदादा हे प्रत्येकी एकवेळा निवडून आले. खा.संदिपान थोरात यांचा अपवाद सोडला तर,प्रत्येक खासदाराने या मतदारसंघाशी आपल्या कार्यकाळात चांगलाच संपर्क ठेवला होता. त्यातूनही ना. रामदास आठवले व माजी खासदार विजयदादांनी या मतदारसंघातील जनतेशी सातत्याने संपर्क ठेवला होता. परंतु, विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर हे मात्र, केवळ आपल्या फलटण तालुक्यापुरतेच मर्यादित क्षेत्राचे खासदार असल्यासारखे राहत असून फलटणनंतर ते पुणे,मुंबई नाहीतर दिल्ली येथे आपली व फलटणकरांची कामे करण्यातच व्यस्त असतात,असे दिसून येते.

       जनतेची गार्‍हाणी ऐकण्यासाठी वेळ मिळेल का ?

माढा लोकसभा मतदारसंघातील फलटण सोडून इतर भागातील जनतेचीही केंद्रीय स्तरावरील अनेक कामे आहेत, अनेक समस्या आहेत पण, त्या कुणापुढे मांडायच्या ? या समस्या सोडविण्यासाठी ज्यांना लोकप्रतिनिधी (खासदार) केले, ते इकडे कधी येतच नाहीत आणि सटी सहा महिन्यांतून कधी आलेच तर, ते फक्त भाजपाच्या पदाधिकार्‍यांनाच माहीत असते. जनतेला मात्र ते येवून गेल्यानंतर बातम्यांतूनच पहायला मिळते.अशी अवस्था आणि व्यवस्था असेल तर, जनतेच्या समस्या कशा सुटणार आणि कामे कशी होणार ? हा जनतेपुढचा मोठा प्रश्न आहे.
आता आगामी लोकसभा निवडणूक ही दीड-दोन वर्षावर येवून ठेपली असून पुढील निवडणूक ही भाजपाला सोपी जावी म्हणून किमान आतातरी, खा.नाईक-निंबाळकर हे मतदारांशी संपर्क साधतील का ? आतातरी जनतेची गार्‍हाणी ऐकण्यासाठी त्यांना वेळ मिळेल का ? आणि आपल्या *कुटूंबाला न सांभाळणारा, “असला नवरा नको गं बाईssss”* असा सूर जनतेतून निघण्याऐवजी पुढच्या पंचवार्षिक निवडणूकीतही “ह्योच नवरा पाहीजे” असे जनता म्हणण्या इतपत चांगले काम त्यांच्या हातून घडेल का ? अशी चर्चा सर्वत्र होताना दिसून येत आहे.

 

 

[contact-form][contact-field label=”Name” type=”name” required=”true” /][contact-field label=”Email” type=”email” required=”true” /][contact-field label=”Website” type=”url” /][contact-field label=”Message” type=”textarea” /][/contact-form]