जपसंकुलाच्या माध्यमातून सुरु असलेले नामप्रसाराचे कार्य अनन्यसाधारण – मोहनबुवा रामदासी
सांगोला :
आपला प्रपंच,आपला परमार्थ सगळं श्री गोंदवलेकर महाराज आहेत.ते कायम आपल्या पाठीशी असतात. त्यांच्यावर श्रद्धा ठेऊन कार्य करावे, जपसंकुलाच्या माध्यमातून सुरु असलेले नामप्रसाराचे कार्य हे अनन्यसाधारण असल्याचे मत समर्थभक्त मोहनबुवा रामदासी यांनी सांगोला येथील चैतन्य जप प्रकल्प शिबिरात व्यक्त केले.
सांगोला येथे आयोजित करण्यात आलेल्या चैतन्य जप प्रकल्प २३ व्या राज्यस्तरीय शिबिराच्या उदघाटन प्रसंगी मोहनबुवा रामदासी हे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शिबिराचे उदघाटक श्री व सौ.हौसाबाई पिराजी धायगुडे,आमदार सुभाषबापू देशमुख,आमदार शहाजीबापू पाटील,माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील,माजी जि.प.अध्यक्षा जयमालाताई गायकवाड,पुरोगामी युवक संघटनेचे राज्याचे अध्यक्ष डॉ.बाबासाहेब देशमुख,माजी नगराध्यक्ष प्रा.पी.सी. झपके,सूतगिरणीचे चेअरमन डॉ.प्रभाकर माळी, जप संकुलचे राज्य अध्यक्ष नंदकुमार जोशी,कार्याध्यक्ष धैर्यशीलभाऊ देशमुख,सांगोला शिबीर प्रमुख इंजि. मधुकर कांबळे आदींसह इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना मोहनबुवा रामदासी म्हणाले की, समर्थांच्या अवतारानंतर समर्थांचे समर्थ कार्य पुढे नेण्यासाठी श्रीराम रायांनी महाराजांची योजना केली. समर्थांचे उर्वरित कार्य महाराजांच्या हातून करायचं होतं. तेच नाम प्रसाराचे कार्य आजही सुरु आहे.चारशे वर्षांपूर्वी दिलेला महामंत्र महाराजांच्या रुपाने प्रफुल्लीत झालेला दिसतो.जागृत ठिकाणी गेल्यानंतर जो अनुभव येतो,तोच अनुभव सांगोल्याच्या ध्यान मंदिरात आला. महाराज म्हणतात त्याप्रमाणे, “जेथे नाम,तेथे माझे प्राण” असल्याचे ध्यानमंदिरात जाणवले.महाराज ज्याच्या हाती माळ देतात, त्याची सर्व जबाबदारी ते घेतात.तेंव्हा त्यांच्यावर श्रध्दा ठेऊन प्रपंच व परमार्थ करावा,असेही त्यांनी आवर्जून सांगितले.
यावेळी आमदार सुभाषबापू देशमुख,आमदार शहाजीबापू पाटील,माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील,डॉ.बाबासाहेब देशमुख,प्रा.पी.सी. झपके,नंदकुमार जोशी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.कार्याध्यक्ष धैर्यशीलभाऊ देशमुख यांनी प्रास्ताविकात,जप प्रकल्पाची माहिती उपस्थितांना दिली.सूत्रसंचालन ऍड.गजानन भाकरे यांनी केले तर,आभार इंजि.मधुकर कांबळे यांनी मानले.
————————————————
शोभायात्रेत महाराष्ट्रातील पुरुष व महिला साधक सहभागी :
शिबिराच्या निमित्ताने सकाळी सांगोला शहरातील प्रमुख मार्गांवरून संपूर्ण महाराष्ट्रातून आलेले जपकार तसेच हत्ती,घोडा,सनई-चौघडा यासह भव्य दिव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली.यामध्ये महाराष्ट्रातील पुरुष व महिला साधक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रस्त्यावर ठिकठिकाणी या शोभायात्रेचे पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले.
——————————————————————————