राजकीय

नीरा उजवा कालव्याचे हक्काचे पाणी पूर्ण क्षमतेने सांगोला तालुक्याला मिळावे – दिपकआबा साळुंखे-पाटील

सांगोला :

सांगोला तालुक्यात सध्या सरासरीच्या निम्मा पाऊस झाल्याने भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे.त्यामुळे नागरिकांना व जनावरांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.त्यामुळे,रब्बी हंगामासाठी सांगोला तालुक्याच्या हक्काचे पाणी नीरा उजवा कालव्यातून मैल ९३ पासून पूर्ण क्षमतेने (४०० क्युसेक्सने) सांगोला तालुक्यासाठी सोडावे,अशी आग्रही मागणी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार दिपकआबा साळुंखे-पाटील यांनी केली.

शुक्रवारी २० ऑक्टोंबर रोजी नीरा उजवा कालव्याचे पाणी वाटपाच्या नियोजनाबाबत पुणे येथील सिंचन भवनमध्ये कालवा सल्लागार समितीची बैठक संपन्न झाली. या बैठकीस राज्याचे उपमुख्यमंत्री नाम.अजित दादा पवार,सहकारमंत्री नाम.दिलीपराव वळसे-पाटील, विधान परिषदेचे माजी सभापती आ.रामराजे नाईक-निंबाळकर,आम.शहाजीबापू पाटील,आम.रवींद्र धंगेकर,आम.समाधान आवताडे,आम.राम सातपुते आम.दत्तामामा भरणे,माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, चेअरमन अभिजित पाटील,पुण्याचे जिल्हाधिकारी, नीरा उजवा कालव्याचे अधीक्षक अभियंता,कार्यकारी अभियंता यांच्यासह कालवा सल्लागार समितीचे सदस्य उपस्थित होते.

या बैठकीत माजी आमदार दिपकआबा साळुंखे-पाटील यांनी सुरुवातीपासूनच सांगोला तालुक्याच्या पाणी प्रश्नावर आक्रमक पवित्रा घेतला.यावेळी ते म्हणाले की, पहिल्या दिवसापासून मैल ९३ येथून पूर्ण क्षमतेने पाणी मिळत नसल्याने सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांची तहान भागत नाही.पाण्याचे व्यवस्थित नियोजन होत नाही, त्यामुळे अनेक शेतकरी पाण्यापासून वंचित राहतात.याकरिता रब्बी हंगामासाठी असलेल्या आवर्तनात पहिल्या दिवसापासून सांगोला तालुक्याचे आवर्तन सुरु असेपर्यंत मैल ९३ येथून ४०० क्युसेक्सने सांगोला तालुक्यासाठी विसर्ग सुरु ठेवल्यास पाणी प्रश्न मार्गी लागेल. तसेच तिसंगी सोनके तलाव ५० टक्के भरुन द्यावा आणि त्याखाली असलेल्या शेतकऱ्यांना तलावातून पाणी न देता आवर्तन सुरु असताना डी ३ मधून दोन पाळ्यामध्ये पाणी द्यावे.तसेच सांगोला तालुक्यातील चिंचोली तलाव ऐन पावसाळ्यातही कोरडा ठणठणीत पडला आहे. तो तात्काळ भरुन द्यावा व याखालील गावांना यातून पाणी सोडावे,अशी आग्रही मागणी माजी आमदार दिपकआबा साळुंखे-पाटील यांनी यावेळी केली.
————————————————

* आबा-बापूंची मागणी व अजितदादांचा आदेश :

रब्बी हंगामासाठी नीरा उजवा कालव्यातून मैल ९३ येथून शेवटच्या दिवसापर्यंत सांगोला तालुक्यासाठी पूर्ण क्षमतेने (४०० क्युसेक्स) पाणी सोडावे,अशी मागणी दिपकआबा साळुंखे-पाटील आणि आमदार शहाजीबापू पाटील यांनी केली.यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी,निरा उजवा कालव्याचे कार्यकारी अभियंता व प्रशासनाला आबा-बापूंच्या मागणीनुसार पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत मैल ९३ पासून सांगोला तालुक्यासाठी पूर्ण क्षमतेने तात्काळ पाणी सोडण्याचे आदेश दिले.
—————————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button