तिसंगी तलावासह महिम,चिंचोली व हलदहिवडी तलाव पूर्ण क्षमतेने भरुन द्यावेत – आमदार शहाजीबापू पाटील

सांगोला :

                          चालू वर्षी सरासरी पेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे उदभवलेली दुष्काळ सदृश्य परिस्थिती व रब्बी हंगामाच्या दृष्टीने निरा उजवा कालव्यातून शेती पिके व नागरिकांना पिण्यासाठी पाणी सोडून सांगोला विधानसभा मतदारसंघातील सांगोला शाखा फाटा क्रमांक ५ तसेच तिसंगी (पंढरपुर) तलावासह महिम, चिंचोली व हलदहिवडी तलाव पाण्याने पूर्ण क्षमतेने भरुन देवून लाभ क्षेत्रातील आवर्तन पूर्ण करण्याची आग्रही मागणी आमदार शहाजीबापू पाटील यांनी पुणे येथील कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत लावून धरली आणि आमदार शहाजीबापू यांच्या मागणी प्रमाणे तातडीने निर्णय घेवून येत्या १० नोव्हेंबर पासून निरा उजवा कालवा अंतर्गत डी-३ पळशी मार्गे पाणी सोडण्याचा महत्वपूर्ण निर्णय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आदेशानुसार कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

                   रब्बी हंगाम २०२३-२०२४ च्या सिंचनाच्या नियोजनासाठी कालवा सल्लागार समितीची बैठक राज्याचे उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री नाम. अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथील सिंचन भवन येथे पार पडली. या बैठकीस विधान परिषद सदस्य आम.रामराजे निंबाळकर,आम.दत्तात्रय भरणे,आम.शहाजीबापू पाटील,आम.समाधान अवताडे,आम.राम सातपुते,आम.रवींद्र धंगेकर,माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील,माजी मंत्री हर्षवर्धन पाटील,अभिजीत पाटील तसेच पुण्याचे जिल्हाधिकारी,निरा उजवा कालव्याचे अधीक्षक अभियंता सुनंदा जगताप,कार्यकारी संचालक कपोले, मुख्य अभियंता हणमंत गुणाले,कार्यकारी अभियंता डुबल आदी मान्यवर उपस्थित होते.

सदर बैठकीच्या सुरुवातीलाच आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगोला तालुक्यातील शेती व पिण्याच्या पाण्याची वस्तूनिष्ठ परिस्थिती मांडून “तिसंगी तलावात पाणी सोडावे, या मागणीसाठी तरुण शेतकरी गेल्या अनेक दिवसापासून तलावाच्या ठिकाणी धरणे आंदोलनास बसले आहेत” ही गंभीर बाब समितीच्या निदर्शनास आणून देत तिसंगी तलावात पाणी सोडून तो तलाव भरुन देण्याची आग्रही मागणी केली. तसेच फाटा क्रं.-९५/३ मधून महिम तलाव, निरा उजवा कालवा मैल ९३ खाली कालव्यातून पाणी सोडून चिंचोली तलाव,हलदहिवडी तलाव तसेच सांगोला शाखा फाटा क्रमांक-५ ला पाणी सोडून लाभ क्षेत्रातील आवर्तन पूर्ण करुन द्यावे, अशी आग्रही मागणी केली होती.
त्यानुसार,आम.शहाजीबापू पाटील यांच्या मागणीवरुन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजितदादा पवार यांनी जलसंपदा विभाग व पाटबंधारे अधिकारी यांचे कडून माहिती घेऊन चर्चा केली व पंढरपूर तालुक्यातील तिसंगी तलावासह सांगोला तालुक्यातील महिम,चिंचोली व हलदहिवडी तलावात पाणी सोडण्याबरोबरच सांगोला शाखा फाटा क्रमांक-५ ला पाणी सोडण्याची तात्काळ कार्यवाही करावी,अशा सूचना दिल्या.
—————————————————————————