सांगोला नगरपालिकेने विविध कागदपत्रांसाठी आकारलेली फी मधील दरवाढ रद्द करावी – अनिलभाऊ खडतरे

 

सांगोला :

           नागरिकांना दैनंदिन कामकाजासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे उदा.मालमत्तेचा उतारा,वारस नोंद, येणे बाकी दाखला,हस्तांतरण व बक्षीस पत्राची नोंद इ. कागदपत्रांसाठी आता सांगोला शहरातील नागरिकांना इतर नगरपालिकांपेक्षा कितीतरी जादा फी द्यावी लागणार असून सांगोला नगरपरिषदेने वाढवलेली ही फीची रक्कम सर्वसामान्य नागरिकांना परवडणारी नसल्याने फी च्या आकारणीमध्ये केलेली वाढ ही नागरिकांवर आर्थिक भुर्दंड लादणारी असल्यामुळे सांगोला नगरपरिषद प्रशासनाने फेरविचार करुन पूर्वीचेच दर लागू करावेत व विविध कागदपत्रांसाठी आकारलेली फी मधील दरवाढ रद्द करावी,अशी मागणी माजी नगराध्यक्ष अनिलभाऊ खडतरे यांनी केली आहे.

मागील दोन-तीन वर्षापासून सांगोला शहरातील व्यापारपेठेवर कोरोनाचा परिणाम आणि त्यानंतर झालेली अतिवृष्टी अशा परिस्थितीत व्यापार्‍याबरोबरच शहरातील सर्वसामान्य नागरिकही अद्याप सावरलेला नाही,आजही बाजारपेठेत मंदी आहे.डोक्यावर कर्जाचे ओझे आहे, परिणामी शहरातील बाजारपेठ अजूनही पूर्ववत सुरळीत झालेली नाही.अशा बिकट परिस्थितीत नगरपालिकेने कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी फी च्या आकारणीमध्ये केलेली वाढ ही नागरिकांवर आर्थिक भुर्दंड लादणारी असून नगरपालिका प्रशासनाने सकारात्मक विचार करुन निर्णय घेणे गरजेचे आहे.

सांगोला शहर व तालुक्यातील नागरिकांची आर्थिक परिस्थिती ही सध्या अतिशय बिकट झाली असून नोटबंदी नंतर लगेच कोरोनामुळे दोन वर्षे अतिशय संकटात गेली आहेत.सांगोला तालुक्यातील ज्या डाळिंबाची ख्याती ही केवळ भारतातच नव्हे तर, जगभरातील देशात होती त्या, डाळिंबाच्या बागा या आज पूर्णपणे उध्वस्त झाल्या आहेत. शासनाने तुकडे बंदी केल्याने जागा, जमिनीचे छोटे-मोठे खरेदी-विक्रीचे व्यवहार पूर्णपणे बंद झाले असून अनेक संकटांशी सामना करण्याची वेळ सर्वांवरच आल्याने बाजारपेठेवर खूप मोठा परिणाम झाला आहे.परंपरागत दुष्काळी तालुका म्हणून सांगोला तालुक्याचा लौकिक आहे, त्यातच वरील सर्व समस्यांची भर पडल्यामुळे तालुक्यातील शेतकरी वर्ग,कष्टकरी कामगार वर्ग,व्यापारी व नोकरदार वर्ग हा अगदी मेटाकुटीला आला आहे. या सर्व बाबींचा विचार करुन नगरपालिका प्रशासनाने कागदपत्रांची पूर्तता करताना लावलेली फी कमी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावा व जनतेच्या हिताचे निर्णय घ्यावेत आणि शहरातील नागरिकांना दिलासा द्यावा,अशी अपेक्षा माजी नगराध्यक्ष अनिलभाऊ खडतरे यांनी व्यक्त केली आहे.
—————————————————————————