नामसाधकांनी आपली साधना अंत:करणातून करावी – ह.भ.प.सुभाष लऊळकर

 

सांगोला :

          नामसाधना मंडळाच्या साधकांनी गेल्या चाळीस वर्षापासून अतिशय निष्ठेने साधना चालू ठेवली आहे. श्रीराम कृपा होत आहे,अनेकांना त्याची अनुभूतीही येत आहे,तेंव्हा नामसाधकांनी आपली साधना ही अंत:करणातून करुन ती वाढवण्याचे कार्य करावे,असा उपदेश ह.भ.प. सुभाष लऊळकर सर यांनी दिला.

नामसाधना मंडळाचा ४१ वा वर्धापन दिन श्री दत्त मंदिर,सांगोला येथे नुकताच संपन्न झाला.त्यावेळी बोलताना ह.भ.प.लऊळकर सर पुढे म्हणाले की,मानवी जीवनात चाळीशी नंतर विचारात परिपक्वता येते. दैनंदिन व्यवहार रामनामाला धरुन असावेत,साधनेचा विसर न होऊ द्यावा, श्वास व नि:श्वासाबरोबर नामस्मरणही व्हावे,पाप कर्मापासून दूर रहावे व नामसाधकांनी आपली साधना करताना अंत:करणातून करावी.आपलं वागणं रामाला आवडलं पाहिजे,रामाला जे आवडणार नाही,ते मी करणार नाही, असा दृढ निश्चय करुन साधना केल्यास नक्कीच समाधान मिळेल, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी कल्याण कांबळे व इंजि.मधुकर कांबळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.ज्येष्ठ नामसाधक सतिषचंद्र गुळमिरे यांचे वाढदिवसा निमित्त प्रद्युम्न कांबळे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.प्रसाद वाटपाने कार्यक्रमाची सांगता झाली. या वर्धापन दिनानिमीत्त पुरुष नामसाधक व महिला नामसाधक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
—————————————————————————