कर्तृत्वान नेतृत्वाची अकाली एक्झिट

अजितदादांच्या निधनाने अवघा सांगोला सुन्न

 

सांगोला :

महाराष्ट्राच्या राजकारणातला “दादा” माणूस म्हणून गेली चार दशके लोकप्रिय असणारे नेते,राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा व राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे काळाच्या पडद्याआड गेले.एका कर्तृत्वान नेतृत्वाची अकाली एक्झिट झाल्याने अवघ्या महाराष्ट्रावर शोककळा पसरली असताना,अजितदादांच्या निधनाने अवघा सांगोलाही सुन्न झाला होता.

                बारामतीच्या काटेवाडीमधून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणारे अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील महानायक होते.शरद पवार यांच्याकडून राजकारणाचे धडे गिरवत अजित पवारांनी आपली राजकीय कारकीर्द फुलवली आणि बारामतीचे आमदार, खासदार ते राज्याचे पाच वेळा उपमुख्यमंत्री असा प्रवास करत त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात आपली छाप उमटवली.

                आपल्या बिनधास्त स्टाईलने फटकेबाजी करत विरोधकांना नामोहरम करणारे,कार्यकर्त्यांची फिरकी घेणाऱ्या दादांनी घेतलेल्या या अकाली एक्झिटने बारामतीकरांसह राजकीय नेत्यांनाही अश्रु अनावर झाले. अत्यंत उमद्या वयाचा,तडफदार आणि आपल्या कामामुळे अवघ्या राज्यात लोकप्रिय असलेला नेता अशी अजित पवार यांची ओळख होती.
===================================
अजितदादा म्हणजे,शब्दाला जागणारे नेते :                                                                                                                   एक डॅशिंग व धडाकेबाज नेते म्हणून ज्यांची संपूर्ण राज्याला ओळख होती,ते राज्याचे अभ्यासू उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार यांचे विमान अपघातात दुःखद निधन झाल्याचे ऐकून मनाला खूप वेदना झाल्या व मन सुन्न झाले.                                                                                                 सांगोल्याच्या देशमुख कुटुंबियांचे व पवार कुटुंबियांचे अगदी जिव्हाळ्याचे नाते आहे,हे संपूर्ण राज्याला माहित आहे. अजितदादा म्हणजे,शब्दाला जागणारे नेते होते. त्यांच्या अकाली जाण्याने संपूर्ण महाराष्ट्रावर दुःखाचे डोंगर कोसळले असून या दुःखामध्ये शेतकरी कामगार पक्ष,सांगोला विधानसभा मतदार संघातील जनता व देशमुख कुटुंबिय सहभागी आहे.                                                                                                       – आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख ========================

अजितदादांच्या बोलण्यात कडवटपणा पण,अंत:करणात मायाळूपणा :

 गेल्या ३५ वर्षांपासून महाराष्ट्राची रात्रंदिवस सेवा करणाऱ्या अजितदादांच्या अपघाती मृत्यूची अतिशय दुःखद घटना घडल्याने एक प्रभावी नेतृत्व हरपले असून “होणारे काम होणार अन,न होणारे काम होत नाही” असे स्पष्ट तोंडावर सांगणारे ते नेते होते.एवढा सरळ वागणारा माणूस राजकारणात यापूर्वीही झाला नाही आणि पुढेही होणार नाही.

         राज्याचे कल्याण करण्याची मनोवृत्ती व भविष्याचा वेध घेणारे नेतृत्व आज आपल्यातून निघून गेल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात फार मोठी पोकळी निर्माण झाली आहे.आमच्या कुटुंबाचे व दादांचे जिव्हाळ्याचे संबंध होते.आम्हा सर्व भावंडांना ते नावानिशी ओळखत होते. अजितदादांच्या बोलण्यात कडवटपणा होता पण, अंत:करणात तितकाच मायाळूपणाही होता.                                                                                       – माजी आमदार ॲड.शहाजीबापू पाटील  ========================

अजितदादांच्या निधनाची बातमी ही काळजाला चिरणारी :

            ज्यानी या राज्याचे तब्बल पाचवेळा उपमुख्यमंत्रीपद भूषवून अत्यंत स्वच्छ व पारदर्शक असा कारभार करुन आपली अभ्यासू वृत्ती दाखवून दिली,त्या स्पष्टवक्ता असलेल्या अजितदादांच्या निधनाची दुःखद बातमी ही काळजाला चिरणारी आहे.

             स्व.आमदार काकासाहेबांपासून ते आजतागायत गेल्या 50 वर्षांपासून साळुंखे-पाटील व पवार कुटुंबियांचे जवळीकीचे, कौटुंबिक व प्रेमाचे संबंध असून त्यांच्या अपघाती निधनाने पवार कुटुंबियांवर, राज्यातील लाखो कार्यकर्त्यांवर व व्यक्तिशः साळुंखे-पाटील कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.साळुंखे-पाटील कुटुंबियांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली.                                            – माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील  ========================