सुमारे साडे तेहतीस हजार मतदार बजावणार मतदानाचा हक्क
सांगोला :
सांगोला नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी शहरातील ४० मतदान केंद्रातून १६ हजार ८३८ महिला व १६ हजार ८५८ पुरुष तसेच इतर २ असे एकूण ३३ हजार ६९८ मतदार हे मतदानाचा हक्क बजावणार असून निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार संतोष कणसे यांनी दिली.
आगामी काळात होणार्या सांगोला नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर, तालुकास्तरीय अधिकारी,राजकिय प्रतिनिधी व पत्रकार बांधव यांची संयुक्त बैठक सांगोला येथील पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर सभागृह येथे नुकतीच संपन्न झाली.सदर बैठकीदरम्यान, निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार संतोष कणसे हे बोलत होते.या बैठकीसाठी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी डाॅ.सुधीर गवळी, पोलीस निरीक्षक विनोद घुगे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा नायब तहसीलदार सोमनाथ साळुंखे तसेच राजकिय प्रतिनिधी व पत्रकार उपस्थित होते.
राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायतीच्या सदस्यपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता राज्य निवडणूक आयोगाने प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून सांगोला नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक-२०२५ करिता आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याच्या उद्देशाने निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार संतोष कणसे यांनी आचारसंहिता व निवडणूक नियमांविषयी खालीलप्रमाणे माहिती दिली.
* राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या वेबसाईटवर नामनिर्देशन पत्र भरण्याकरिता दि.१० नोव्हेंबर ते १७ नोव्हेंबर २०२५ (दुपारी २ वाजेपर्यंत) उपलब्ध कालावधी असणार आहे. तसेच नामनिर्देशन पत्रे स्विकारण्याचा कालावधी हा दि.१० ते १७ नोव्हेंबर (दु.३ वाजेपर्यंत) असणार आहे. रविवार या सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशन पत्र स्विकारण्यात येणार नाहीत.
* नामनिर्देशन पत्राची छाननी व वैधरित्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी दि.१८ नोव्हेंबर सकाळी ११ वाजता प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
* नामनिर्देशन पत्रे मागे घेण्याचा अंतिम दिनांक (अपील नसेल तेथे) दि.१९ नोव्हेंबर ते २१ नोव्हेंबर दुपारी ३ वाजेपर्यंत कालावधी देण्यात आला आहे.
* अपील असल्यास वैधरित्या नामनिर्देशित केलेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून ३ दिवसांच्या आत जिल्हा न्यायाधीशाकडे अपील करता येईल.निवडणूक निर्णय अधिकारी यांनी अपिलाचा निर्णय लवकरात लवकर प्राप्त करुन घेण्यासाठी प्रयत्न करावेत.
* दि.२१ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर या दरम्यान अपिलाचा निर्णय ज्या तारखेस देण्यात येईल,त्या तारखेनंतर तिसऱ्या दिवशी किंवा तत्पूर्वी मात्र दि.२५ नोव्हेंबर पर्यंत कालावधी देण्यात आला आहे.
* निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी दि.२६ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
* सांगोला नगरपरिषदेसाठी दि.२ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ७.३० वाजलेपासून ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत या कालावधीत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.तर,३ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणी व निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
* आचार संहिता कालावधी हा दि.४-११-२०२५ ते ३-१२-२०२५ या कालावधीसाठी राहणार आहे.
* शासन राजपत्रात निकाल प्रसिद्ध करणे, दि.१०-१२-२०२५ पूर्वी कलम १९ मधील तरतुदीनुसार होणार आहे,अशी माहिती तहसीलदार संतोष कणसे यांनी यावेळी दिली.
——————————————————————————
* खर्चाची मर्यादा पाळणे बंधनकारक :
निवडणूक आयोगाच्या आदेशाप्रमाणे नगराध्यक्ष व नगरसेवक यांना खर्चाची मर्यादा पाळणे बंधनकारक असणार आहे. यासाठी थेट नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारास ७ लाख ५० हजार रुपये तर,नगरसेवक पदाच्या उमेदवारास २ लाख ५० रुपये मर्यादा देण्यात आली आहे.
* प्रचारासाठी असणार एवढाच कालावधी :
नगरपरिषद निवडणुकीसाठी दि.२७ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर २०२५ (रात्री १२ वाजेपर्यंत) या कालावधीत उमेदवारांना प्रचार करता येणार आहे.
* जाहीर सभा घेण्यासाठी ठिकाणे :
सांगोला शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक,नेहरु चौक,जयभवानी चौक,महात्मा फुले चौक,न्यू इंग्लिश स्कूल मैदान याठिकाणी जाहीर सभा घेण्यासाठी परवानगी देण्यात येईल.
More Stories
पदवीधरांनी मतदार नोंदणी करावी – अॅड.गजानन भाकरे
नुकसानग्रस्त शेतकर्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी – डॉ.परेश खंडागळे
सांगोल्यात ओला दुष्काळ जाहीर करा – आमदार डॉ.बाबासाहेबांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी