राजकीय

स्व.आबासाहेबांनी,मी व दीपकआबांनी आपल्या आमदारकीत किती निधी आणला ? याची तुलना करावी – आमदार शहाजीबापू पाटील

शहाजीबापूंची ही ऐतिहासिक निवडणूक - श्रीकांतदादा देशमुख

 

सांगोला :                                                            सांगोला तालुक्याच्या विकास कामांसाठी मी माझ्या ५ वर्षाच्या काळात तब्बल ५ हजार कोटीहून अधिक निधी आणला असून मी केलेल्या विकास कामांची शहानिशा करावी.तसेच सांगोला तालुक्यात स्व.आबासाहेबांनी (तत्कालीन आमदार गणपतराव देशमुख यांनी) ५५ वर्षे व दीपकआबांनीही ६ वर्षे आमदारकी भोगली असून या दोघांनीही आपल्या आमदारकीत तालुक्यासाठी किती निधी आणला ? याचीही तुलना तालुक्यातील जनतेने करावी,असे आवाहन महायुतीचे उमेदवार आम.शहाजीबापू पाटील यांनी आपल्या प्रचारादरम्यान केले.

महायुतीचे अधिकृत उमेदवार शहाजीबापू पाटील यांच्या प्रचारार्थ सांगोला तालुक्यातील अनेक गावात सोमवारी ११ नोव्हेंबर रोजी प्रचारसभा घेण्यात आल्या.या प्रचार सभा दरम्यान शहाजीबापू पाटील हे बोलत होते.यावेळी बोलताना पुढे ते म्हणाले की, उद्याची निवडणूक ही तालुक्याच्या विकासासाठी व तरुणांच्या हाताला रोजगार उपलब्ध करुन देण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून लढवत आहे. महायुती सरकारने शेतकऱ्यांना शेतीपंपाचे विजबील माफी,मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना,मुलींसाठी मोफत शिक्षण,महिलांना एसटी प्रवासामध्ये ५० टक्के सवलत,वर्षाला ३ गॅस सिलेंडर मोफत दिले.तसेच तालुक्याच्या शेतीच्या पाण्याचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी मोठा निधी आणल्याचे आमदार शहाजीबापू यांनी सांगीतले.

                             तसेच दिघंची ते वाणीचिंचाळे रस्ता कॉंक्रिटीकरण करण्यासाठी ४५० कोटी रुपये निधीची फाईल प्रस्तावित आहे आणि शिरसी ते जत असा २ तालुक्यांना व २ जिल्ह्यांना जोडणारा रस्ता काँक्रिटीकरण करणे यासाठी १७७ कोटी रुपयांचा निधी आणला असून लवकरच ही कामे सुरु होतील. तालुक्यातील एकही गांव शेतीच्या पाण्यापासून वंचित ठेवले नाही.केवळ मला विरोध करायचा म्हणून विरोधी उमेदवार विरोधात निवडणूक लढवत आहेत. महायुती सरकारने राज्यात अनेक महत्वाकांक्षी योजना आखून प्रत्येक समाजाला व घटकाला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.हे सर्व करुनही विकास कामाचे न बोलता,विरोधक हे माझ्यावरती नुसती टीका करतात,त्याबद्दल नाराजी व्यक्त करत,मताच्या माध्यमातून त्यांना त्यांची जागा दाखवा व तालुक्याच्या उर्वरित विकासासाठी मतदारांनी मला पुन्हा एकदा जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून द्या आणि पुढील आणखी ५ वर्षे आमदारकीची संधी द्या,असे आवाहन आमदार शहाजीबापू पाटील यांनी यासमयी केले.

             यावेळी बोलताना भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांतदादा देशमुख म्हणाले की,उद्याची विधानसभा निवडणूक ही निर्णायक आहे.ही निवडणूक अटीतटीची असून राजकीय दृष्ट्या ऐतिहासिक आहे. यावेळी माजी पं.स.सदस्य सुभाषभाऊ इंगोले,भाजपचे सोलापूर जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा प्रवक्ते ॲड.महादेव कांबळे, भीमशक्ती संघटनेचे राज्याचे अध्यक्ष विजय बनसोडे, विधानसभा प्रमुख अभिजीत नलवडे,नामदेव भोसले, किरण पाटील,माणिक भोसले आदींनी आपल्या मनोगतात सांगितले की,आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगोला तालुक्यासाठी टेंभू,म्हैसाळ,निरा उजवा कालवा, उजणीचे जया-कट्टापूरचे पाणी मंजूर करुन घेतले.सर्व कार्यालये एकत्र असावीत म्हणून,शहरात तीन मजली प्रशासकीय इमारत मंजूर केली, ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा दिला,रेस्ट हाऊसचे काम पूर्ण केले.भव्य असे ईदगाह मैदान उभे केले.सांगोला येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासाठी २ कोटी रुपयांचा निधी दिला.कोळा येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी २ कोटी रुपये निधी दिला.होलार समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ मंजूर केले.तालुक्यात पाझर तलाव, रस्ते,समाज मंदिरे मंजूर करुन अनेक कामे पूर्ण केली. ५ वर्षात सांगोला तालुक्यात केलेली विकास कामे पुस्तकाच्या रुपाने जनतेसमोर ठेवली असून विकास कामाला न्याय देऊन महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार शहाजीबापू पाटील यांना विक्रमी मताधिक्क्याने विजयी करावे. तालुक्याला लागलेला दुष्काळाचा कलंक कायमस्वरुपी नष्ट करण्यासाठी शेतीच्या तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावला. चंद्रभागा नदीचे पाणी शिरभावी योजनेच्या माध्यमातून तालुक्याला मिळाले.जलसंपदा विभागात त्यांनी मंजूर केलेल्या पाण्याचे जीआर तपासून पहा. तालुक्यातील ९५ हजार शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यासाठी कोट्यावधी रुपयांचा पिक जळीताचा निधी दिला.इतर कोणत्याही तालुक्याला असा निधी मिळाला नाही. आमदार शहाजीबापू पाटील हे विकास पुरुष असून ते पाणीदार आमदारही आहेत.आमदार शहाजीबापू पाटील नुसते आमदार होणार नाहीत तर,ते नामदार म्हणून तालुक्यामध्ये येतील. आमदार शहाजीबापू पाटील यांना विक्रमी मताने विजयी करुन त्यांना नामदार करुया,असे आवाहन विवीध मान्यवरांनी या प्रचार सभेत केले.

     सांगोला तालुक्यातील वाकी,हलदहिवडी,शिरभावी, धायटी,चिंचोली,बामणी,देवळे,सावे,मेथवडे,संगेवाडी या गावामध्ये महायुतीचे उमेदवार आमदार शहाजीबापू पाटील यांच्या प्रचारार्थ कॉर्नर सभा घेण्यात आल्या.या सभेसाठी पोलीस पाटील साहेबराव पाटील,श्रीकांत जाधव,बलवडीचे उपसरपंच विकास मोहिते,रामस्वरुप बनसोडे,श्रीनिवास साळुंखे,तात्यासाहेब उबाळे,संतोष साळुंखे,शंकर साळुंखे यांच्यासह मान्यवर,पदाधिकारी, कार्यकर्ते व मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
             ——————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button