कोल्हापूर/प्रतिनिधी :
प्रिंट मिडिया व डिजिटल मिडिया या एकाच नाण्याच्या दोन बाजू असून लोकशाही संरक्षणासाठी व समाज कल्याणासाठी पत्रकारांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून कार्यरत राहून समाजाला न्याय मिळवून द्यावा,असे सांगून डिजिटल मिडिया क्षेत्रालाही प्रिंट मिडिया प्रमाणे स्वंतत्र दर्जा देऊन पत्रकारांच्या कल्याणासाठी सर्वतोपरी सहकार्य करु,असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिले.
कोल्हापूर येथील श्री सिद्धगिरी कणेरी मठ येथे डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेचे दुसरे महाअधिवेशन नुकतेच संपन्न झाले. या अधिवेशनाला संपूर्ण महाराष्ट्रातून सुमारे दोन हजार हजार डिजिटल मिडिया क्षेत्रातील संपादक व पत्रकार प्रतिनिधी उपस्थित होते.या अधिवेशनात प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे बोलत होते.प्रारंभी अधिवेशनाचे उदघाटन करवीर नगरीचे शाहू महाराज छत्रपती,राज्याचे उच्च व तंत्रज्ञान शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील,आयुष्यमान भारतचे महाराष्ट्र राज्य प्रमुख डॉ.ओमप्रकाश शेटे,खासदार धनंजय महाडिक,खासदार धैर्यशील माने,डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेचे राज्य अध्यक्ष राजा माने, राज्य उपाध्यक्ष सतीश सावंत,पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विकास भोसले,राज्य संघटक तेजस राऊत,कोल्हापूर जिल्हाध्यक्ष सुहास पाटील,उपाध्यक्ष भाऊसाहेब फास्के,कोल्हापूर शहराध्यक्ष प्रशांत चुयेकर,जिल्हा सचिव धीरज रुकडे यांच्या प्रमुख उपस्थितीत व राज्यभरातून आलेल्या संघटनेच्या २ हजार संपादक व पत्रकारांच्या उपस्थितीत हे अधिवेशन संपन्न झाले.
यावेळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची रोखठोक मुलाखत प्रसिद्ध अभिनेते निर्माता दिग्दर्शक गिरीश कुलकर्णी यांनी घेतली.यावेळी बोलताना अजितदादा पवार यांनी मुलाखतीत आपली रोखठोक भूमिका स्पष्ट करीत महाविकास आघाडीच्या स्थापनेपासून ते महायुतीच्या पाठींब्यापर्यंतच्या प्रश्नांना सडेतोड उत्तरे दिली.प्रिंट मिडिया व डिजिटल मीडिया या एकाच नाण्याच्या दोन बाजू असून लोकशाही संरक्षणासाठी समाज कल्याणासाठी पत्रकारांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून कार्यरत राहून समाजाला न्याय मिळवून द्यावा. डिजिटल मिडिया क्षेत्राला प्रिंट मिडिया प्रमाणे स्वंतत्र दर्जा देऊन पत्रकारांच्या कल्याणासाठी सर्वतोपरी सहकार्य करु,अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी यावेळी दिली.
यावेळी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी प्रिंट मीडिया व डिजिटल मीडियाच्या माध्यमातून योगदानाबद्दल अध्यक्ष राजा माने यांचे विशेष कौतुक केले. आयुष्यात आलेल्या संकटांना संधी मानून आपल्याबरोबरच ग्रामीण क्षेत्रात काम करणाऱ्या आपल्या पत्रकार बांधवांना न्याय देण्यासाठी संघटना निर्माण केली आहे.राजा माने यांच्या डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेचे काम कौतुकास्पद असून डिजिटल क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व पत्रकार बांधवांची एक सार्वजनिक विश्वस्त संस्था म्हणून निर्मिती करावी, यामध्ये आम्हाला सहभागी करुन ट्रस्ट विश्वस्त यांच्या माध्यमातून पत्रकारांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवून पत्रकारांच्या कल्याणासाठी आपण सर्वतोपरी सहकार्य करु.यामध्ये पत्रकार कुटुंब कल्याण,आरोग्य व शिक्षण याकरिता पत्रकारांसाठी वेगळी आर्थिक तरतूद करण्यासाठी कल्याणकारी महामंडळाची स्थापना करण्याचा प्रस्ताव शासनाकडून मंजूर करुन न्याय मिळवून देणार असल्याचे चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले.
याप्रसंगी,खासदार धनंजय महाडिक म्हणाले की,डिजिटल मीडिया पत्रकार संघटना ही देशातील एकमेव डिजिटल संघटना असून राष्ट्रीय स्तरावर संपूर्ण भारतभर याचा आपण विस्तार करावा.डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे ५ हजार सदस्यांनी एकमेकाला सहकार्य करुन सबस्क्राईबवर एकमेकांना फॉलो करत बघणाऱ्यांची संख्या वाढवली तर,खऱ्या अर्थाने गुगलच्या माध्यमातून आपणास आर्थिक उन्नतीचा नवा मार्ग मिळेल व खऱ्या अर्थाने पत्रकार व संघटना बांधणीचाही उद्देश सफल होईल. डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेचे कार्य कौतुकास्पद असून राजा माने यांच्या कार्यास आपला सदैव पाठिंबा असून डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेच्या कार्याला आपण सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी, खासदार धैर्यशील माने यांनी डिजिटल मिडिया क्षेत्रातील पत्रकारांना मार्गदर्शन करीत भविष्याचा वेध घेऊन सकारात्मक पत्रकारिता करावी,अशी अपेक्षा व्यक्त केली.
यासमयी,डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या वतीने समाजात विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्यांचा डिजिटल स्टार महाराष्ट्र महागौरव पुरस्कार वर्षाताई लांजेवार (चंद्रपूर),प्रा.शिवराज मोटेगांवकर (लातूर),तुकाराम कुंदकुरे (छत्रपती संभाजी नगर),विकास थोरात (सातारा),विद्याताई पोळ (कोल्हापूर), डॉ.प्रियाताई शिंदे व डॉ.अरुणाताई बर्गे (सातारा),निखिल वाघ (पुणे), भारती चव्हाण (सांगली),प्रवीण माळी (सांगली),शशिकांत धोत्रे (सोलापूर),डॉ.राहुल कदम (पुणे), प्रकाश अवताडे (सांगली),नलिनी गायकवाड (पुणे) यांना सन्मानित करण्यात आले.यासह डिजिटल स्टार महागौरव पुरस्कार कृष्णराज महाडिक (कोल्हापूर),संजय कांबळे (पुणे) व नागनाथ सुतार (पंढरपूर) यांना सन्मानित करण्यात आले.
राज्यभरातून आलेल्या डिजिटल मीडियामधील संपादक व पत्रकारांना नवनवीन तंत्रज्ञानाच्या माहितीसाठी परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.कृत्रिम बुद्धिमत्ता आणि माध्यम या विषयावर छत्रपती शिवाजी विद्यापीठ,कोल्हापूरच्या पत्रकारिता विभाग प्रमुख डॉ.निशा मुंडे-पवार,सायबर कोल्हापूरचे डॉ. राजेंद्र पारिजात,दै.पुढारी कोल्हापूरचे डिजिटल एडिटर मोहसीन मुल्ला,सोलापूर विद्यापीठाचे जनसंवाद विभागाचे माजी विभाग प्रमुख डॉ.रवींद्र चिंचोलकर,संघटनेचे राज्य उपाध्यक्ष नंदकुमार सुतार यांनी राज्यभरातून ३१ जिल्ह्यातून आलेल्या दोन हजार संपादक व पत्रकारांना विस्तृत मार्गदर्शन केले.यावेळी राज्य संघटक प्रमोद तोडकर यांनी राज्य शासनाला सादर केले जाणारे ११ ठराव अधिवेशनात मांडले व याला राज्य कार्यकारिणी व सदस्यांनी एकमताने मंजुरी दिली.
डिजिटल मीडिया संपादक,पत्रकार संघटनेच्या कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व सदस्यांनी अत्यंत उत्कृष्ट नियोजन केल्याने महा अधिवेशन यशस्वी झाले.यावेळी राज्य संघटक शामल खैरनार, सहसचिव केतन महामुनी,कोषाध्यक्ष अमित इंगोले, सहकोषाध्यक्ष सूर्यकांत वायकर,प.महाराष्ट्र उपाध्यक्ष टिंकू पाटील,राज्य संघटक एकनाथ पाटील,राज्य संघटक संजय जेवरीकर,राज्य संघटक मुरलीधर चव्हाण,सुनिल उंबरे, हमीद इनामदार, सुभाष चिंधे, प्रवीण नागणे,राज्य कार्यकारिणी सदस्य सचिन भिलारे,प्रमोद मोरे,चंद्रकांत भुजबळ,ताराचंद म्हस्के, पद्माकर कुलकर्णी,दीपक नलावडे,रितेश पाटील,संतोष सूर्यवंशी,संजय कदम,अमोल पाटील,प्रमोद मोरे,प्रवीण खंदारे,संजय भैरे,प्रफुल्ल वाघुले यांनी विशेष परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक कोल्हापूर जिल्हाध्यक्ष सुहास पाटील यांनी केले तर,आभार कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब फास्के यांनी मानले.
——————————————————————————
अजितदादांच्या दिलखुलास मुलाखतीत टाळ्या अन् शिट्ट्या :
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची प्रकट मुलाखत अभिनेते गिरीश कुलकर्णी यांनी घेतली.१ तास ५० मिनीटे घेतलेल्या या प्रदीर्घ मुलाखतीत अजितदादांनी अगदी सडेतोड व स्पष्ट उत्तरे दिली.या मुलाखती दरम्यान राज्यातील घडामोडीवर व राजकीय हेवेदाव्यावर दादांनी दिलेली उत्तरे ऐकून सभागृहात प्रचंड टाळ्या अन् शिट्ट्या देखील होत होत्या.या मॅरेथॉन मुलाखतीचे थेट प्रक्षेपण राज्यातील सर्व इलेकट्रॉनिक मिडिया व सर्व डिजिटल मिडियामध्ये राज्यात व देशभर दाखविले गेले.
——————————————————————————
श्री सिद्धगिरी मठ कणेरीच्या अध्यात्मिक सहवासाची राज्यातील संपादक पत्रकारांना नवी प्रेरणा :
श्री सिद्धगिरी मठ कणेरीच्या अध्यात्मिक सहवासाची राज्यातील संपादक पत्रकारांना नवी प्रेरणा मिळाली असून कणेरी येथील मठाच्या वतीने राज्यातील ३१ जिल्ह्यातून आलेल्या २ हजार संपादक पत्रकारांची अत्यंत उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. निसर्गरम्य वातावरणात अध्यात्माचा पदोपदी स्पर्श लाभलेल्या या पावन भूमीमध्ये डिजिटल मीडियाचे अधिवेशन भव्य दिव्य आनंदी वातावरणामध्ये विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले. डिजिटल मीडियाचे झालेले हे अधिवेशन पत्रकारांसाठी नवपर्वणी व नवचैतन्य देणारे ठरले.
——————————————————————————
ठळक वैशिष्ठ्ये :
* राज्यातील शेकडो डिजिटल प्लॅटफॉर्म्स आणि चॅनल्सच्या बातम्यांनी अधिवेशन गाजले.
* गिरीश कुलकर्णीच्या प्रश्नांना अजितदादांनी दिली रोखठोक उत्तरे.
* चंद्रकांतदादांनी दिला पत्रकारांच्या कुटुंबहिताचा कानमंत्र.
* श्रीमंत शाहू महाराज,खा.धनंजय महाडिक,खा. धैर्यशिल माने व डॉ.ओमप्रकाश शेटेंनी डिजिटल पत्रकारांना दाखविली नवी दिशा.
* विविध क्षेत्रातील दिग्गज महाराष्ट्र महागौरव पुरस्काराने सन्मानित.
* “कृत्रिम बुद्धिमत्ता” विषयावरील परिसंवादाने झाले विचार मंथन.
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
More Stories
जवळा गावाच्या विकासाला चालना देण्यासाठी कधीही मागे हटणार नाही – दीपकआबा साळुंखे-पाटील
सांगोले नगरपरिषदेचा दीड लाख शिलकीचा अर्थसंकल्प मंजूर
अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक,पत्रकार संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी राजा माने