वाढीव दूध अनुदान प्रक्रियेतील जाचक अटी शिथिल करण्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना भेटणार – दीपकआबा साळुंखे-पाटील

सांगोला :

राज्य सरकारने नुकताच गायीच्या दुधाला प्रतीलिटर ५ रुपये शासकीय अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु हे अनुदान मिळवण्यासाठी अतिशय क्लिष्ट प्रक्रिया पार पाडावी लागणार असून शासन निर्णयातील या जाचक अटी आणि नियम शिथिल करण्यासाठी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील यांनी केले.

सांगोला येथील राष्ट्रवादी भवन येथे शनिवारी १३ जानेवारी रोजी खाजगी व सहकारी दूध संस्थांचे पदाधिकारी तसेच सबंधित विभागाचे अधिकारी यांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली.या बैठकीला राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष तानाजी पाटील,जिल्हा दूध संघाचे संचालक विजय येलपले,चंद्रकांत चौगुले,जालिंदर बाबर,धनंजय पवार,नवनाथ भोसले,दादासाहेब घाडगे,नारायण गावडे,आनंदा साळुंखे,दिलीप बंडगर यांच्यासह सांगोला तालुक्यातील सर्व खाजगी व सहकारी दूध संस्थांचे चेअरमन उपस्थित होते.यावेळी, त्यांना मार्गदर्शन करताना दीपकआबा बोलत होते.

यावेळी बोलताना माजी आमदार दीपकआबा पुढे म्हणाले की,आधीच डाळिंब बागा उध्वस्त झाल्या असून त्यातच दुधाचे दर घसरल्यामुळे शेतकरी प्रचंड संकटात सापडला होता.ही बाब राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व देवेंद्र फडणवीस यांच्या सर्वप्रथम मी निदर्शनास आणून दिली.यानंतरच राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या दुधाला वाढीव ५ रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेतला. संपूर्ण राज्यातील दूध दरवाढीच्या विषयावर सांगोला तालुक्यातून आवाज उठवला आणि त्याचा संपूर्ण राज्याला फायदा झाला. सध्या दूध दरवाढी बाबत शेतकऱ्यांना जे ५ रुपयांचे अनुदान मिळणार आहे त्यासाठी, शासनाने अनेक जाचक अटी व नियमांची पूर्तता करण्याचे निर्देश दिले आहेत.यासाठी सर्वप्रथम जास्तीत जास्त जनावरांचे टॅगींग करणे गरजेचे आहे.सांगोला तालुक्यातील एकही दूध उत्पादक शेतकरी या अनुदानापासून वंचित राहणार नाही,याची दूध संस्थांचे पदाधिकारी व प्रशासकीय अधिकारी यांनी काळजी घ्यावी.शासन स्तरावरुन जी कांही मदत लागेल त्यासाठी,आपण राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून प्रयत्न करु,असेही शेवटी माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील यांनी स्पष्ट केले.
—————————————————————————

    जनावरांचे टॅगींग करणे आवश्यक :

          दूध उत्पादक शेतकऱ्यांना थेट त्यांच्या खात्यावर अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.यासाठी जनावरांचे टॅगींग करणे यासह अन्य तांत्रिक बाबी आवश्यक आहेत.संपूर्ण प्रशासन यासाठी शेतकऱ्यांच्या मदतीला तयार आहे.शेतकरी व सर्व दूध उत्पादक संस्थांनी प्रशासनाला सहकार्य करावे आणि जास्तीत जास्त या अनुदानाचा लाभ मिळवून घ्यावा.
– असलम सय्यद (तालुका पशुवैद्यकीय अधिकारी)
——————————————————————————