अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त झालेल्या द्राक्षबागांचे पंचनामे करुन नुकसान भरपाई मिळावी – डाॅ.बाबासाहेब देशमुख
सांगोला :
अवकाळी पावसामुळे राज्यातील द्राक्ष बागायतदारांचे विशेषत: सांगोला मतदारसंघातील शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन तातडीने मदत मिळावी,अशा आशयाचे निवेदन शेकापचे युवा नेते तथा पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ.भाई बाबासाहेब देशमुख यांनी मदत व पुनर्वसन मंत्री नाम.अनिल पाटील यांना दिले आहे.
सध्या,नागपूर येथे विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरु असून सांगोला विधानसभा मतदारसंघातील विविध समस्या सोडविण्यासाठी शेकापचे युवानेते डाॅ.बाबासाहेब देशमुख यांनी नागपूर येथे अनेक मंत्री व आमदार यांची भेट घेऊन मतदारसंघातील समस्यांचा पाढा वाचला व स्व.आबासाहेबांच्या कार्यप्रणालीची आठवण करुन देत जनतेच्या समस्या त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या.
गेल्या कांही दिवसांपूर्वी अवकाळी पावसामुळे अनेक पिकांचे नुकसान झाले असून त्यामध्ये द्राक्ष बागांचेही अतोनात नुकसान झाले.द्राक्षबागा उध्वस्त झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे.अशा नुकसानग्रस्त द्राक्षबागांचे तातडीने पंचनामे करुन शासनाने ताबडतोब नुकसान भरपाई जाहीर करुन शेतकऱ्यांना मदत करावी,अशी मागणी डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी मदत व पुनर्वसन मंत्री नाम.अनिल पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली असल्याची माहिती शेकापचे प्रसिध्दी प्रमुख चंद्रकांत सरतापे यांनी दिली.
——————————————————————————