सांगोला :
माझ्या आयुष्यात तुमची साथ व आशीर्वाद हीच सर्वात मोलाची संपत्ती असून कार्यकर्ता हेच माझं भांडवल आहे.आजपर्यंत,प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासह कुटुंबातील सदस्य म्हणून नातं जपलं आहे. राजकारण व समाजकारण करताना कार्यकर्त्यांच्या खिशाला कधीही कात्री लागू दिली नाही. प्रामाणिक कार्यकर्ता मोठा झाला पाहिजे,ही माझी भूमिका असून कार्यकर्त्यांमध्ये उर्मी आणि जिद्द असली पाहिजे, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही आपली जबाबदारी ओळखून कामाला लागलं पाहिजे. येत्या काळात सोशल मीडिया जागृत व बूथ कमिट्या सक्षम झाल्या पाहिजेत,त्या दृष्टीने पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कामाला लागावे,असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार दिपकआबा साळुंखे-पाटील यांनी सांगोला येथील बैठकीत केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,सांगोला शहर आणि तालुका बूथ कमिटी व सोशल मीडिया विभाग प्रमुख युवकांची बैठक राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष तानाजीकाका पाटील यांच्या निवासस्थानी पार पडली. यावेळी युवा कार्यकर्त्यांना समुपदेशन करताना दिपकआबा हे बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा युवकचे नेते सतीशभाऊ काशीद-पाटील, तालुकाध्यक्ष मधुकर बनसोडे,युवक तालुकाध्यक्ष अनिलनाना खटकाळे, युवकचे शहराध्यक्ष रवीदादा चौगुले,युवानेते योगेशदादा खटकाळे, राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष चंद्रकांत शिंदे,राष्ट्रवादीचे नेते दिलीप मोटे,शिवणे गावचे लोकनियुक्त सरपंच दादासो घाडगे,ॲड.महादेव कांबळे,युवा उद्योगपती सूर्याजी खटकाळे,सतीशभाऊ पाटील यांच्यासह सांगोला शहर व तालुक्यातील बुथ कमिटीचे मेंबर, सोशल मीडिया विभाग प्रमुख तसेच राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलतांना दिपकआबा पुढे म्हणाले की,राजकिय परिस्थिती कशी ही असली,सत्ता असली किंवा नसली तरी,पदाधिकारी व कार्यकर्ते यांना कधी झळ बसू दिली नाही आणि विकास कामांमध्येही खंड पडू दिला नाही. प्रामाणिकपणे जनतेची सेवा केली.जात,धर्म,पक्ष,पार्टी यापेक्षा आलेल्या माय-भगिनी व वयोवृध्द नागरिक आणि तरुणांचे काम करत राहणे,हे माझे ध्येय आहे. तालुक्यात असा कोणता पुढारी नाही की,त्याचं काम मी केलं नाही, कोणाच्या पालापाचोळ्यावर पाय दिला नाही किंवा कोणाला काम करतो म्हणून,नादी लावले नाही. स्व. काका आणि काकींनी दिलेले समाज सेवेचे व्रत घेवूनच समजाचे प्रश्न सोडवत आहे आणि अडचणीत असलेल्यांना मदत करण्याची भूमिका आजपर्यंतच्या काळात बजावली आहे.ज्या-ज्या वेळी काम करण्याची संधी उपलब्ध झाली, त्या-त्या वेळी संधीचे सोने करुन दाखवले आहे.
यावेळी दीपकआबा पुढे म्हणाले की, सोलापूर जि.प.च्या अध्यक्षपदी असताना जयमालाताई गायकवाड यांनी २८ व्या क्रमांकावर असलेली जिल्हा परिषद तिसर्या क्रमांकावर आणली.तसेच मी विधानपरिषदेचे प्रतिनिधित्व करत असताना संपूर्ण जिल्ह्याला समान न्याय दिला,मोठा निधी जिल्ह्याला मिळवून दिला. विधानपरिषदेचाही निधी असतो,हे दाखवून देत संपूर्ण जिल्ह्यात विकास कामांचा डोंगर उभा करून दाखविला आहे. तालुक्यातील बळीराजावर ज्या-ज्या वेळी संकटे उभारली त्या- त्या वेळी मदतीचा हात देण्याची भूमिका बजावली आहे. पाणी,दूध दरवाढ व यापूर्वी चारा टंचाई असे एक ना अनेक प्रश्न घेऊन ते सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले आहेत. कोणावर टीका-टिपण्णी करण्यापेक्षा कुणाच्या प्रयत्नाने काम होवू शकते,हे तालुक्याला माहिती आहे. आपल्या गावात काम करत असताना कोणी नादालाच लागला नाही पाहिजे,असं काम कार्यकर्त्यांनी करायचं आहे.यासाठी कायमस्वरुपी मी तुमच्यासोबत असेन,अशी ग्वाही दिपकआबा यांनी यावेळी दिली.यावेळी मधुकर बनसोडे, तानाजी काका पाटील यांच्यासह सांगोला शहर व तालुक्यातील बूथ कमिटी मेंबर व सोशल मीडिया विभाग प्रमुख सदस्यांनीही आपले विचार व्यक्त केले.
—————————————————————————
आता माघार नाही,विधानसभा निवडणूक लढवायचीच
“आज पर्यंत तुमचा आदेश मानला, तुम्ही सांगितले ते केलं,मात्र आता २०२४ ला आमचं ऐकावं लागेल, आता माघार नाही.विधानसभा निवडणूक लढवायचीच” असा एकमुखी ठराव घेत उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही आग्रही मागणी लावून धरली.
यावर दिपकआबा साळुंखे-पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या मनाप्रमाणे,परंतु योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल,पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मागणीचा निश्चितपणे विचार केला जाईल.सध्या कार्यकर्त्यांनी बुथ बांधणी व सोशल मीडिया सक्षम ठेवण्यासाठी जोमाने कामाला लागावे,असे दिपकआबांनी सांगितले.
——————————————————————————
More Stories
भारत-संयुक्त अरब अमिराती संसदीय मैत्री समितीवर खा.धैर्यशील मोहिते-पाटील
सांगोला तालुक्यातील जि.प.व पं.स.च्या अनेक उमेदवारांचा खा.मोहिते-पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश
डॉ.परेश खंडागळे यांचे बंधूही लढवणार नगरपालिकेची निवडणूक