खा.धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या प्रयत्नांना यश
सांगोला :
केंद्र सरकारच्या क्षेत्रनिहाय विकास कार्यक्रमांतर्गत (Cluster Development Programme – CDP) केळी निर्यात क्षेत्रात सोलापूर जिल्ह्याचा नुकताच समावेश करण्यात आला असून या निर्णयामुळे जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.
माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी ३ डिसेंबर २०२४ रोजी दिल्ली येथे केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांची भेट घेऊन ही मागणी केली होती.अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे.
शेतकऱ्यांसाठी मोठी संधी : आर्थिक सहाय्य,प्रयोगशाळा व पॅक हाऊसची सुविधा होणार :
सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक संघटना (FPOs) आणि निर्यातदारांना पायाभूत सुविधा उभारणीसाठी तसेच केळी,इतर फळे व भाज्यांची गुणवत्ता तपासणी आणि विक्रीनंतर व्यवस्थापन करण्यासाठी इन-हाऊस प्रयोगशाळा उभारण्यासाठी आर्थिक सहाय्य देण्यात आले आहे. APEDA च्या आर्थिक सहाय्य योजनेअंतर्गत (FAS) एकत्रित ३ पॅक हाऊस आधीच स्थापन झाले असून आणखी कांही प्रकल्प प्रक्रियेत असल्याचे सांगण्यात आले.
GAP प्रमाणपत्र :
APEDA ने देशभरातील विविध उत्पादने ओळखून त्यांना ग्लोबल गुड अॅग्रिकल्चरल प्रॅक्टिसेस (GAP) प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय घेतला आहे.यामध्ये महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील केळी उत्पादनाला प्राधान्य देण्यात आले आहे.हे प्रमाणपत्र प्रिमियम निर्यात बाजारपेठांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.या प्रमाणपत्रामुळे जागतिक बाजारपेठांमध्ये निर्यातीची अधिक संधी उपलब्ध होणार आहे.
सोलापूर जिल्ह्यात केळी लागवडीखाली सुमारे १९ हजार हेक्टर क्षेत्र असून महाराष्ट्रातील एकूण केळी निर्यातीपैकी ५८ टक्के निर्यात ही सोलापूर जिल्ह्यातून होते.केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे सोलापूर जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांचा मोठा फायदा होणार असल्याने शेतकरी वर्गातून आनंद व्यक्त केला जात आहे.
——————————————————————————
माढा लोकसभा मतदार संघातील प्रश्न सोडवण्यासाठी नेहमीच तत्पर :
माझ्या मागणीची दाखल घेत सोलापूर जिल्ह्याला केळी निर्यात क्लस्टर म्हणून मान्यता दिल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील केळी उत्पादकांना जागतिक बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर संधी मिळेल व जिल्ह्याच्या कृषी अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. याकरिता,सर्वप्रथम मी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांचे आभार मानतो.
राष्ट्रीय नेते शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील व खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली माढा लोकसभा मतदारसंघातील प्रश्न सोडवण्यासाठी मी नेहमीच तत्पर आहे.
– खासदार धैर्यशील मोहिते-पाटील
More Stories
जवळा गावाच्या विकासाला चालना देण्यासाठी कधीही मागे हटणार नाही – दीपकआबा साळुंखे-पाटील
सांगोले नगरपरिषदेचा दीड लाख शिलकीचा अर्थसंकल्प मंजूर
अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक,पत्रकार संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी राजा माने