टेंभू व म्हैसाळचे आवर्तन सुरु करुन माण व कोरडा नदीवरील सर्व बंधारे तात्काळ भरुन द्यावेत – आम.डॉ.बाबासाहेब देशमुख

आ.डाॅ.बाबासाहेबांची ना.विखे- पाटील यांचेकडे आग्रही मागणी

सांगोला :

सांगोला विधानसभा मतदार संघामध्ये सध्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली असून पाण्याची पातळी खालावलेली आहे.नदी,नाले,ओढे,तलाव,बंधारे सर्व कोरडे पडण्याच्या मार्गावर आहेत.त्यामुळे,सांगोला तालुक्यातील पिकांना जीवदान देण्यासाठी टेंभू व म्हैसाळ योजनेचे आवर्तन सुरु करुन माण व कोरडा नदीवरील सर्व बंधारे तात्काळ भरुन द्यावेत,अशी आग्रही मागणी करणारे निवेदन सांगोल्याचे आमदार डाॅ.बाबासाहेब देशमुख यांनी राज्याचे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांना दिले.

         सांगोला तालुक्यातील तसेच विधानसभा मतदार संघातील पाणी प्रश्नासंदर्भात आमदार डाॅ.बाबासाहेब देशमुख यांनी जलसंपदामंत्री नाम.राधाकृष्ण विखे-पाटील यांची नुकतीच समक्ष भेट घेवून त्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.

सध्या,मतदारसंघातील कांही ठिकाणी पाण्याआभावी पिके जळून जाण्याचा धोका निर्माण झालेला असून ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर निर्माण झालेला पाणी प्रश्न मार्गी लावण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. सद्य:स्थितीमध्ये लाभक्षेत्रामध्ये उन्हाची तीव्रता वाढली असून पाण्याची पातळी खालावलेली आहे.त्यामुळे,दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झालेली असून पिकांना तातडीने पाण्याची आवश्यकता भासत आहे.

तसेच सध्या सांगोला विधानसभा मतदारसंघातील बरेचसे क्षेत्र निरा उजवा कालव्याच्या लाभक्षेत्रामध्ये येते.निरा उजवा कालव्याचे सन २०२४-२०२५ चे उन्हाळी आवर्तन तातडीने सुरु करावे व सोनके तलाव लवकरात लवकर भरुन देण्यात यावा आणि म्हसवड (राजेवाडी) या मध्यम प्रकल्प योजनेतून कटफळ तलावात पाणी सोडण्यात येवून आगामी उन्हाळी आवर्तन मिळावे, अशी मागणी आम.डाॅ.बाबासाहेब देशमुख यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
——————————————————————————

सकारात्मक निर्णय घेवून योग्य ती कार्यवाही करण्यात येईल :

सांगोला विधानसभा मतदार संघातील दुष्काळी परिस्थितीचा व शेतीसाठी लागणार्‍या पाण्याच्या आवश्यकतेचा विचार करुन संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांकडून अहवाल मागवून सकारात्मक निर्णय घेत योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.
– नाम.राधाकृष्ण विखे-पाटील