महत्वाच्या बातम्या

तरुणांच्या हाताला काम असेल तरच ग्रामीण अर्थव्यवस्था गतिशील होईल – दीपकआबा साळुंखे-पाटील

सांगोला :

दुष्काळी परिस्थितीमुळे शेतीतून उत्पन्न नाही आणि दूधाला दर नसल्याने पशुपालनही परवडत नसल्यामुळे सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडून गेली आहे.त्यासाठी शेतकरी कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरळीत चालायचा असेल तर, प्रत्येक कुटुंबातील किमान एका तरी तरुणाच्या हाताला काम असेल तरच ग्रामीण अर्थव्यवस्था गतिशील होईल,असे मत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील यांनी व्यक्त केले.

            माजी आमदार दीपकआबा यांच्या ७ जानेवारी रोजी येणार्‍या वाढदिवसा निमीत्त “नोकरी आपल्या दारी” हा संकल्प घेऊन रोजगार महोत्सवाचे नियोजन करण्यासाठी बोलावण्यात आलेल्या बैठकीत दीपकआबा बोलत होते.या बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील,युवकचे जिल्हा अध्यक्ष अभिजित आव्हाड,कार्याध्यक्ष अक्षय भांड,तानाजीकाका पाटील, डॉ.पियुष साळुंखे-पाटील, युवकचे तालुकाध्यक्ष अनिलनाना खटकाळे,युवानेते सतीश काशीद,माजी नगराध्यक्ष चंदन होनराव,माजी नगरसेवक सोमनाथ लोखंडे व जुबेर मुजावर आदींसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना दीपकआबा पुढे म्हणाले की, गेल्या ३ ते ४ वर्षात सांगोला तालुक्यातील सिंचनाच्या योजना बऱ्यापैकी मार्गी लागल्या आहेत. त्यामुळे सांगोला तालुक्यात पाणी दाखल झाले आहे.परंतु,या काळात सांगोला तालुक्याला वरदान ठरलेले डाळींब पिक हे मर,पिन,होल बोरर व तेल्या यासारख्या रोगांनी पूर्णपणे उध्वस्त झाले आहे.अशावेळी स्वतःचा आणि आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करण्यासाठी अनेक कुटुंबे संघर्ष करत आहेत. शिक्षण घेऊनही तरुणांच्या हाताला काम नाही.अशा परिस्थितीत त्यांना काम मिळवून देण्यासाठी राज्यातच नाही तर,देशात नामवंत ठरलेल्या यशस्वी फाऊंडेशन या संस्थेच्या माध्यमातून सांगोला येथे भव्य रोजगार महोत्सव आयोजित केला आहे. यामध्ये शिक्षण घेऊनही बेरोजगार असलेल्या तरुणांनी तसेच १० वी १२ वी शिकून कामासाठी इच्छुक असणाऱ्या तरुणांनी सहभागी व्हावे.ज्यांचे शिक्षण पूर्ण आहे त्यांना,त्यांच्या शैक्षणिक पात्रते नुसार तात्काळ नोकरी मिळेल तर, ज्यांची शैक्षणिक पात्रता नाही,त्यांना प्रशिक्षण देऊन नोकरीही दिली जाईल. विशेष म्हणजे,प्रशिक्षणाच्या काळातही त्यांना पगार दिला जाईल. म्हणून जास्तीत जास्त तरुणांनी या रोजगार महोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन यासमयी माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील यांनी केले.

यावेळी बोलताना राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील म्हणाले की, सांगोला तालुक्यातील राजकीय,सामाजिक,शैक्षणिक, आर्थिक,सांस्कृतिक व दैनंदिन क्षेत्रातील कोणताही प्रश्न सोडविण्यासाठी माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील हे सदैव तत्पर असतात. दीपकआबांनी आपल्या जन्मदिनी म्हणजेच येत्या ७ जानेवारीला नोकरी महोत्सव आयोजित केला असून या नोकरी महोत्सवात सांगोला शहर व तालुक्यातील तरुणांनी सहभागी होऊन जास्तीत जास्त या संधीचा लाभ घ्यावा,असे आवाहनही उमेश पाटील यांनी केले. यासमयी,ॲड.महादेव कांबळे यांनीही विचार मांडले तर, संतोष पाटील यांनी आभार मानले.
—————————————————————————

दीपकआबांच्या वाढदिवसानिमीत्त “नोकरी आपल्या दारी” या उपक्रमाचा लाभ घ्यावा :

ज्या तरुणांनी १० वी,१२ वी,पदवी, डिग्री किंवा डिप्लोमाचे शिक्षण पूर्ण केले आहे,त्यांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरी मिळेल. ज्यांना नोकरी करायची आहे पण,शिक्षण नाही,अशांना आम्ही प्रशिक्षण देऊन नोकरी देऊ, प्रशिक्षणार्थी कालावधीत अशा तरुणांना योग्य पगार देऊ. आमच्याकडे १ हजाराहून अधिक राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय आणि बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत.आजवर आम्ही लाखाहून अधिक तरुणांच्या हाताला काम दिले आहे.नोकरी मिळवण्यासाठी कुणालाही एक रुपायासुद्धा खर्च करावा लागणार नाही. माजी आमदार दिपकआबांच्या वाढदिवसानिमीत्त आम्ही “नोकरी आपल्या दारी” घेऊन येणार आहोत त्याचा आपण लाभ घ्यावा.                                                            – यशस्वी फाऊंडेशन
—————————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button