महत्वाच्या बातम्या

बलवडी ते मेथवडे पर्यंतचे बंधारे पूर्ण क्षमतेने भरण्यात येणार – आमदार शहाजीबापू पाटील

सांगोला : 

                           खरीप हंगामातील पिकांना जीवदान देण्यासाठी टेंभू योजनेचे आवर्तन सुरु करुन सांगोला तालुक्यातील माण नदीवरील सर्व बंधारे भरुन देण्याच्या मागणीची दखल घेत टेंभू योजनेच्या पाण्याचे आवर्तन आटपाडी तालुक्यातील घाणंद तलावात सुरु असून सध्या तलाव भरला असल्याने टेंभूचे पाणी ३५० क्युसेक्सने माण नदीत दाखल होत आहे. टेंभूच्या पाण्याने माण नदीवरील बलवडी ते मेथवडे पर्यंतचे सर्व बंधारे तसेच बुद्धेहाळ,जुनोनी,हातीद,पाचेगाव,राजुरी, जुजारपूर,हटकर मंगेवाडी या गावातील तलाव व बंधारे पूर्ण क्षमतेने भरण्यात येणार असल्याची माहिती शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली.

      यावर्षी टेंभू योजनेचे उन्हाळी आवर्तन पहिल्यांदाच सांगोला तालुक्याला मिळाले.त्यावेळी माण नदीवरील सर्व बंधारे भरुन यशस्वीरित्या आवर्तन पूर्ण झाले होते. ऐन उन्हाळ्यात माण नदीला पाणी आल्याने शेतकरी सुखावला होता. खरीप हंगामातील पिकांना जीवदान देण्यासाठी तसेच पिण्याच्या पाण्याचा,शेतीच्या पाण्याचा तसेच जनावरांच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी टेंभू योजनेचे पाणी माण नदीत सोडून बलवडी ते मेथवडेपर्यंतचे सर्व बंधारे भरुन देण्याची मागणी शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस,टेंभू उपसा सिंचन योजनेचे कार्यकारी अभियंता राजन रेड्डीयार यांच्याकडे केली होती.या मागणीची दखल घेऊन टेंभू सिंचन प्रकल्पाचे आवर्तन सुरु करण्यात आले आहे.सध्या टेंभूचे आवर्तन आटपाडी तालुक्यातील घाणंद तलावात सुरु असून तलाव शंभर टक्के भरला आहे.त्यामुळे, टेंभूचे पाणी घाणंद तलावातून माण नदीत दाखल होत आहे.

टेंभूच्या पाण्याने माण नदीवरील बलवडी ते मेथवडे पर्यंतचे सर्व बंधारे पूर्ण क्षमतेने भरुन घेण्यात येणार आहेत.तसेच बुद्धेहाळ,जुनोनी,हातीद,पाचेगाव, जुजारपूर,हटकर मंगेवाडी,राजुरी या गावातील तलाव व बंधारे पूर्ण क्षमतेने शंभर टक्के भरण्यात येणार आहेत. टेंभूच्या पाण्याचे आवर्तन सुरु झाल्याने जनावरांच्या पाण्याचा व चाऱ्याचा प्रश्न मार्गी लागला असल्याचे आ.शहाजीबापू पाटील यांनी सांगीतले.

       टेंभूचे पाणी माण नदीत दाखल झाल्याने बलवडी, वझरे,नाझरे,चिणके,अनकढाळ,वाटंबरे,कमलापूर, वासुद,अकोला,कडलास,वाढेगाव,बामणी,सावे, मांजरी,देवळे,मेथवडे या गावांसह अन्य १५ ते २० गावांना फायदा होणार असून या पाण्यामुळे सिंचनाचा प्रश्न मार्गी लागला असल्याची माहिती शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली.
——————————————————————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button