कासाळगंगा शेतकरी उत्पादक कंपनीची संकल्पना प्रेरणादायी – कृषीमंत्री नाम.धनंजय मुंडे

 

सांगोला :

देशभरात आज कृषी क्षेत्रात दररोज नवनवीन प्रयोग केले जात आहेत. “कासाळगंगा फाऊंडेशन” या संस्थेने मृत अवस्थेत असलेल्या कासाळगंगा या नदीचे तब्बल ५० हून अधिक कि.मी.लोक सहभागातून पुनरुज्जीवन करून आधीच वेगळा आदर्श निर्माण केला होता.आता या फाऊंडेशनच्या माध्यमातून महुद व परिसरातील शेतकऱ्यांनी कासाळगंगा शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना करून खऱ्या अर्थाने राज्यातील इतर शेतकऱ्यांसमोर आदर्श निर्माण केला असून कासाळ गंगा शेतकरी उत्पादक कंपनीची संकल्पना प्रेरणादायी
असल्याचे गौरवोदगार कृषीमंत्री नाम.धनंजय मुंडे यांनी काढले.

कासाळगंगा शेतकरी उत्पादक कंपनीच्या उदघाटन प्रसंगी माजी आमदार दिपकआबा साळुंखे-पाटील यांच्या  येथील निवासस्थानी नाम.धनंजय मुंडे हे बोलत होते. यावेळी, दिपकआबा साळुंखे-पाटील,आमदार बबनदादा शिंदे,माजी आमदार प्रशांत परिचारक, कल्याणराव काळे संस्थेचे चेअरमन विजय खबाले,सचिव प्रतीक ताटे यांच्यासह परिसरातील शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी बोलताना नाम.धनंजय मुंडे पुढे म्हणाले की,सांगोला तालुका जरी पर्जन्यछायेच्या प्रदेशात असला तरीही या तालुक्यातील शेतकरी कष्टाळू आणि प्रामाणिक आहेत. वर्षानुवर्षे मृत अवस्थेत असलेल्या नदीचे लोकसहभागातून पुन:र्जीवन करून या नदीतून हजारो एकर क्षेत्र सिंचनाखाली आणले. संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांनी आदर्श घ्यावा असेच हे उदाहरण आहे. नदीचे पुन:र्जीवन करुन या नदीमुळे बागायत झालेल्या परिसरातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन कासाळगंगा शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करून पिकांच्या लागवडीपासून शेतमालाच्या विक्रीपर्यंत शेतकऱ्यांची सर्व जबाबदारी ही कंपनी घेणार असल्याने खऱ्या अर्थाने येथील शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती होणार आहे. “कासाळगंगा फाऊंडेशन” या संस्थेने केलेले काम पाहून आगामी काळात या फाऊंडेशनसाठी शासनाच्या वतीने आपण सर्वतोपरी प्रयत्न करू व कासाळगंगा शेतकरी उत्पादक कंपनीच्या पहिल्या कोल्ड स्टोअरेजच्या उदघाटनासाठी आपण स्वतः येऊ,असा शब्दही शेवटी कृषी मंत्री नाम.धनंजय मुंडे यांनी दिला.
————————————————

आमच्यात कष्टाचा व प्रामाणिकपणाचा दुष्काळ नाही :

राज्यभर सांगोला तालुका दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जात असला तरीही सांगोला तालुक्यातील शेतकरी हा प्रचंड कष्टाळू आणि प्रामाणिक आहे. आपल्या कष्टाने त्यांनी सांगोल्याच्या डाळिंबाचे नांव जगभर केले. त्याच कष्टाने आणि जिद्दीने कासाळगंगा शेतकरी उत्पादक कंपनी उभा राहत आहे. या संस्थेला येथील लोकप्रतिनिधी आणि शेतकरी म्हणून आवश्यक ते सर्व सहकार्य करु.कष्ट व प्रामाणिक पणाच्या जोरावर येथील शेतकरी पुन्हा शेती क्षेत्रात क्रांती केल्याशिवाय राहणार नाही.
                                   – दिपकआबा साळुंखे-पाटील
                               ————————————————

शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती घडवून आणणे,हे संस्थेचे ध्येय :

कासाळगंगा नदीच्या लाभक्षेत्रात असणाऱ्या सुमारे ५ हजार शेतकऱ्यांना सोबत घेऊन ही संस्था काम करणार आहे. लागवडीपासून ते उत्पादनापर्यंत या शेतकऱ्यांना बी-बियाणे,खते-औषधे,शेती उपयोगी औजारे पुरवणे तसेच शेतीविषयक तज्ञ लोकांचे मार्गदर्शन व कार्यशाळा आयोजित करणे,उत्पादित निर्यातक्षम शेतमालासाठी शीतगृहे निर्माण करून शेतमालाला योग्य भाव मिळावा,यासाठी त्याचा साठा करणे व या परिसरातील शेतमाल थेट परदेशात निर्यात करुन या परिसरातील शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती घडवून आणणे हेच या संस्थेचे ध्येय आहे.
                    – विजय खबाले (चेअरमन,कासाळगंगा शेतकरी उत्पादक कंपनी)
—————————————————————————