सांगोला शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यालगत असलेले अतिक्रमण तात्काळ काढावे – ॲड.रोहित सोनवणे

 

सांगोला :

सांगोला शहरातील छत्रपती शिवाजी महाराज,पंडित जवाहरलाल नेहरु, महात्मा जोतिबा फुले,पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर,डाॅ.बाबासाहेब आंबेडकर आदी महापुरुषांच्या पुतळ्यालगत गेल्या अनेक वर्षापासून हातगाडे व दुकाने यांनी अतिक्रमणे करुन दुकाने थाटली आहेत.या अतिक्रमणामुळे कांही ठिकाणी तर,महापुरुषांचे पुतळे दिसूनही येत नाहीत. पुतळ्यालगतचे हातगाडे हे बारा महिने त्याच ठिकाणी उभे असतात. त्यामुळे त्या परिसरात कायम घाण व कचरा देखील पडलेला पहावयास मिळतो,ही बाब अतिशय लाजीरवाणी आहे.त्यामुळे,सांगोला शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यालगत असलेले अतिक्रमण तात्काळ काढावे,अशा आशयाचे निवेदन ॲड.रोहित सोनवणे यांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डाॅ.सुधीर गवळी यांना दिले आहे.

महापुरुषांच्या पुतळ्यांना पाहिले की,त्यांनी केलेल्या महान कार्याची स्मृती व प्रेरणा मिळत असते,त्यांच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून समाजातील लोक आपली वाटचाल योग्य दिशेने करु शकतात.परंतु सांगोला शहरातील सर्वच महापुरुषांच्या पुतळ्यांच्या अवती भवती हातगाड्यांचा विळखा पडलेला असल्यामुळे पुतळ्यांचे दर्शनच होत नाही.तर,लोकांनी कुणाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवायचा ? असा प्रश्न पडतो.ही बाब शहराच्या दृष्टीने अत्यंत अशोभनीय व लाजीरवाणी अशी आहे.

सांगोला शहरातील छ.शिवाजी महाराज,पं. जवाहरलाल नेहरु, म.जोतिबा फुले,पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर,डाॅ.बाबासाहेब आंबेडकर इत्यादी महापुरुषांच्या पुतळ्यालगत असलेले सर्व हातगाडी,टपर्‍या व दुकाने यांचे अतिक्रमण तात्काळ व कायमस्वरुपी काढून टाकून संबंधित हातगाडी व्यवसायिकांनी पुन्हा त्याच ठिकाणी अतिक्रमण करु नये याकरिता,त्यांचे इतर योग्य ठिकाणी पुनर्वसन करुन महापुरुषांच्या पुतळ्यांना हातगाड्यांचा पडलेला अतिक्रमणाचा विळखा काढून टाकण्याची तात्काळ कार्यवाही करावी,अशा मागणीचे निवेदन ॲड. रोहित सोनवणे यांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डाॅ. सुधीर गवळी यांना दिले आहे.
—————————————————————————